- आविष्कार देसाई, अलिबागनगदी पिकांचा फॉर्म्युला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वापरावा यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. २०१६-१७ या कालावधीत सुमारे ५०० एकर शेतामध्ये हळदीचे पीक घेण्याची योजना आखण्यात आली आहे. या माध्यमातून सुमारे १८ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जमिनीत ‘पिवळे सोने’ पिकविणारे शेतकरी चांगलेच मालामाल होणार आहेत.जिल्ह्यात पाऊस चांगला पडत असल्याने प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. मात्र शेतीच्या मशागतीसाठी मजूर मिळत नाही आणि मिळालेच तर त्यांची बडधास्त ठेवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येते. या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे नगदी पीकवर लक्ष केंद्रित केले आहे. हळदीचे पीक हे प्रामुख्याने सांगली आणि सातारा जिल्ह्यात घेतले जाते. जिल्ह्यामध्ये मुबलक पाऊस पडत असल्याने हळदीचे पीक घेतल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा कमाविता येईल. यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने १५० क्विंटल हळदीचे बियाणे शेतकऱ्यांना देऊ केले होते. अलिबाग तालुक्यात चार एकर शेतात हळदीचे पीक घेतले आहे. कर्जतमध्ये २७ एकर, पेण ३० एकर, रोहे ३ एकर, खालापूर ४ एकर आणि श्रीवर्धन तालुक्यात २ अशा एकूण ७० एकरामध्ये हळदीची लागवड २०१५-१६ मध्ये घेण्यात आली. आली आहे.एक एकरमध्ये साधारणत: २५ क्विंटल हळदीचे उत्पादन निघते. बाजारात एक क्विंटल हळद सुमारे १५ हजारांनी विकली जाते. ७० एकरामध्ये २ हजार २५० क्विंटल हळदीचे उत्पादन निघणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगलेच फळ मिळणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी कॅश क्रॉप लागवडीची संधी सोडता कामा नये. हळदी पिकातून आर्थिक उन्नती साधून जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख उंचाविण्यासाठी २०१६-१७ या वर्षात ५०० एकर क्षेत्रावर हळद पिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. कर्जत येथे सुमारे नऊ लाख रुपये किमतीचे हळद प्रोसेसिंग युनिट उभारण्यात येणार आहे. - बाळासाहेब पाटील, कृषी अधिकारी, रायगड भविष्यात बाजारात हळदीला चढा दरच मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त संख्येने हळदीच्या पिकाकडे वळावे. ज्यांना हळदीचे पीक घ्यावयाचे आहे, त्यांनी जवळच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा- अरविंद म्हात्रे, कृषी सभापती, रायगड
यंदा ५०० एकरमध्ये हळदीचे पीक
By admin | Published: February 10, 2016 3:13 AM