तूळ राशिभविष्य 2021 : जीवनातील काही क्षेत्रांकडे लक्ष देण्याची निकड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 03:19 PM2020-12-17T15:19:16+5:302020-12-17T15:19:41+5:30
Libra horoscope 2021: ह्या वर्षी काही नवीन संबंध जुळू शकतात. आपले मित्र व नातेवाईक आपल्या सुखास कारणीभूत होतील. आपल्या चांगल्या कार्यात ही मंडळी आपल्या खांद्यास खांदा लावून मदत करतील.
तूळ राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष सामान्य फल देणारे आहे. आपणास जीवनातील काही क्षेत्रात चांगली तर काही क्षेत्रात सर्वोत्तम फले मिळणार असली, तरी काही क्षेत्रात आपणास अधिक लक्ष देणे गरजेचे ठरेल. ह्या वर्षात तूळ राशीच्या व्यक्तींना छोटीशी आरोग्य विषयक समस्या सुद्धा त्रासदायी ठरणार असल्याने स्वतःच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. आवश्यकतेनुसार किंवा काही आवश्यक कार्यांसाठी आपणास कुटुंबापासून काही दिवसांसाठी विभक्त व्हावे लागण्याच्या शक्यतेमुळे कौटुंबिक दुराव्याचे दुःख आपणास सहन करावे लागू शकते. कुटुंबियांना सुद्धा आपली अनुपस्थिती जाणवेल. आर्थिक आघाडीसाठी हे वर्ष सामान्य परिणाम देणारे आहे. अधून मधून आपणास काही मोठा लाभ सुद्धा होईल, मात्र एकंदरीत मिळणारे फल हे सामान्यच असेल. ह्या वर्षी काही नवीन संबंध जुळू शकतात. आपले मित्र व नातेवाईक आपल्या सुखास कारणीभूत होतील. आपल्या चांगल्या कार्यात ही मंडळी आपल्या खांद्यास खांदा लावून मदत करतील. २०२१ दरम्यान विनाकारण व अनिच्छेने आपणास अनेक प्रवास करावे लागल्याने आपल्याला मानसिक त्रास सोसावा लागेल. आपल्या आर्थिक स्थितीवर सुद्धा ह्याचा भार पडण्याची शक्यता असल्याने आपणास काळजी घ्यावी लागेल. जर प्रवासास जाणे गरजेचे असेल तर पूर्ण तयारी करूनच जावे. ग्रहांच्या स्थिती नुसार आपले चतुर्थ व दशम स्थान प्रभावित होत असल्याने आपले कौटुंबिक व व्यावसायिक जीवन ह्यात समतोल साधावा लागेल, अन्यथा आपल्या हातून गोष्टी निसटून जातील व दोन्ही क्षेत्रात आपल्यावर आव्हानांना सामोरे जाण्याचा दबाव येईल. असे असले तरी आपली तूळ रास असल्याने जीवनात समतोलपणा राखण्याचे कौशल्य निसर्गतः आपल्यात असल्याने आपल्या कौशल्याचा यथोचित वापर करून आपण यश प्राप्त करू शकाल. २०२१ दरम्यान आपल्या मातेची प्रकृती नाजूक होण्याच्या शक्यतेमुळे आपणास तिच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. काही विशिष्ट परिस्थितीत आपणास मातेस रुग्णालयात सुद्धा दाखल करावे लागू शकते. मानसिक दृष्ट्या आपणास हि स्थिती काळजीत ठेवणारी सुद्धा असेल. आर्थिक दृष्ट्या सुद्धा आपणास ह्याच्या परिणामांसाठी तयारी करावी लागेल. आपल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या समजून घेऊन कर्तव्यांचे पालन करावे व गरज भासल्यास कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्यांचा सल्ला सुद्धा घ्यावा, ज्यामुळे आपणास योग्य प्रकारे कार्य करणे सहज शक्य होऊ शकेल.
वैवाहिक जीवन (Libra, Love and relationship Horoscope 2021)
२०२१ दरम्यान तूळ राशीच्या जातकांना प्रेमाच्या दृष्टिकोनातून सामान्य फलदायी ठरणारे असले तरी ह्या वर्षी आपल्या प्रियव्यक्तीची ओळख आपल्या कुटुंबियांना करून देण्याची संधी आपणास मिळेल. ह्या वर्षी एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळाली तरी काही आवश्यक कार्यांमुळे आपल्यात काही काळासाठी दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान आपल्यातील दुरावा न दर्शवता कोणत्याही प्रकारे वेळात वेळ काढून एकमेकांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. आपले संबंध टिकवून ठेवण्यासाठी वार्तालाप म्हणजेच संवाद चालूच ठेवावा. वैवाहिक जीवनासाठी २०२१ चा मधला भाग अनुकूल असून वर्षाच्या अखेरच्या महिन्यात आपल्या प्रेमास विवाह बंधनात परिवर्तित करण्याची संधी सुद्धा आपणास मिळू शकते. विवाहितांना २०२१ चे वर्ष वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्यास अनुकूल आहे. आपल्यासाठी २०२१ ची सुरवात चांगली असेल. आपल्या जोडीदारात भरपूर आत्मविश्वास निर्माण झाल्याने आपल्या यशाचा मार्ग सुकर होऊ शकेल. जोडीदाराचा सल्ला आपल्यासाठी उपयुक्त ठरून आपण जीवनातील प्रगती पथावर वाटचाल कराल.
१२ राशींचे २०२१ चे भविष्य वाचण्यासाठी क्लिक करा!
आर्थिक (Libra, Finance Horoscope 2021)
आर्थिक बाजूचा विचार केल्यास २०२१ हे वर्ष तूळ राशीच्या जातकांसाठी सामान्याहून अधिक चांगले असल्याचे दिसत आहे. आपल्यासाठी वर्षाची सुरवात मध्यम फलदायी राहील. आपण मात्र विनाकारण आर्थिक बाबींची काळजी करत बसाल. आपला पैसा चोरीस जाईल किंवा कोणी हडप करेल अशी एक अनामिक भीती आपल्या मनात निर्माण होईल. विनाकारण ह्या भीतीने आपण ग्रासलेले राहाल, मात्र एप्रिल ते मे महिन्या दरम्यान आपणास एखादा मोठा आर्थिक लाभ होऊन आपल्या अनेक आर्थिक समस्या संपुष्टात येतील. तूळ राशीच्या जातकांना ऑगस्ट २०२१ दरम्यान शासनाद्वारा एखादा धन लाभ होण्याची शक्यता सुद्धा आहे. आपले नेहमीचे खर्च कमी असले तरी प्रवासांसाठी आपणास सतत पैसा खर्च करावा लागेल. वर्षाचा मधला भाग आर्थिक प्राप्तीचा असून ह्या दरम्यान आपणास यथायोग्य आर्थिक वैभव प्राप्त होईल. वर्षाचे अखेरचे महिने आर्थिक दृष्ट्या नाजूकच आहेत.
नोकरी, व्यवसाय, करिअर (Libra, Job-Career-Business Horoscope 2021)
तूळ राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांना २०२१ चे वर्ष शुभ फल देणारे आहे. आपली नोकरीतील कामगिरी उत्कृष्ट होऊ शकेल. आपले मन कामात गुंतल्याने आपली कामगिरी उत्तम होण्यास मदतच होईल. आपण स्वतःशीच स्पर्धा कराल व त्यामुळे आपणास उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. त्यामुळे आपण निव्वळ प्रशंसितच होणार नसून आपणास मोठा पदभार सुद्धा मिळू शकेल. २०२१ च्या मध्यास तूळ राशीच्या जातकांची पदोन्नती संभवते. ह्यासाठी जानेवारी महिना सुद्धा अनुकूल आहे. आपण जर व्यापार करत असाल तर आपल्या भागीदाराने आपले काही नुकसान करू नये म्हणून त्याच्यापासून काही गोष्टी गुप्त ठेवण्याची काळजी घ्या. व्यापाराच्या दृष्टिकोनातून २०२१ चा मधला भाग अपेक्षेनुसार चांगला जाईल व अखेरचा भाग सामान्यतः चांगली फलप्राप्ती करून देणारा असेल. वर्षाच्या मध्यास संपत्तीच्या माध्यमातून धन प्राप्ती होण्याची दाट शक्यता आहे. ह्या दरम्यान आपणास स्थावर किंवा जंगम संपत्ती प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिक्षण (Libra, Education Horoscope 2021)
तूळ राशीच्या जातकांसाठी २०२१ हे वर्ष शैक्षणिक दृष्ट्या विशेष असल्याचे दिसत नाही. वर्षाची सुरवात काहीशी निर्बलीच असेल. अशा परिस्थितीत आपणास आपल्या परिश्रमांवरच लक्ष केंद्रित करावे लागेल. आपल्या कष्टानुसारच आपणास फल प्राप्त होईल. शिक्षणात काही कारणाने अडथळा येण्याची शक्यता असल्याने आपणास भक्कम तयारी करावी लागेल. २०२१ च्या मध्यास नवीन काही शिकण्याचा प्रयत्न आपण कराल. वर्षाचे अखेरचे महिने शिक्षणासाठी जास्त अनुकूल आहेत. जे जातक विदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे वर्ष सामान्यच राहील. त्यांना प्रयत्नांची शिकस्त केल्या नंतरच आंशिक यश प्राप्त होईल. तूळ राशीचे जे जातक उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांना एप्रिल ते जून महिन्याच्या मध्यास यश प्राप्त होऊन मनासारख्या विद्यालयात प्रवेश मिळण्याची दाट शक्यता आहे.
आरोग्य (Libra, Health Horoscope 2021)
२०२१ चे वर्ष तूळ राशीच्या जातकांसाठी सामान्यच आहे. वर्षाची सुरवात काहीशी निर्बली असल्याने आपणास आपल्या आहारावर व सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल. आपणास विषबाधा होण्याची शक्यता असल्याने कोणत्याही प्रकारचे शिळे व बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. आपणास श्वसन संस्थेशी संबंधित त्रास होण्याची सुद्धा शक्यता असून आपण अति थंडी किंवा गरमी पासून स्वतःचे रक्षण करावे. आपल्या मनात अधून मधून आपल्या आरोग्या विषयी अनामिक भीती निर्माण होईल, मात्र आपण ही भीती दूर करून भविष्याचा विचार करावा. भरपूर व्यायाम व ध्यान - धारणा करून आपले शरीर निरोगी ठेवावे. तसे केल्यानेच आपण आव्हानांना सामोरे जाऊ शकाल.