रत्नागिरी : अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन विविध ठिकाणी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर करणाऱ्या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी व ३७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लांजा तालुक्यातील शिपोशी येथे ही घटना अडीच वर्षांपूर्वी घडली होती.समीर शशिकांत जाधव (२१, रा. शिपोशी, लांजा, रत्नागिरी) याच्या विरोधात पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, २४ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी पीडित अल्पवयीन मुलगी कॉलेजहून घरी येत असताना संशयिताने तिचे अपहरण केले होते.याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात फूस लाऊन पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. समीर जाधव याची लांजा पोलिसांनी कसून चौकशी केली. २०१७ रोजी एका लग्नात पीडित मुलगी व समीर जाधव यांची ओळख झाली होती.
त्यानंतर प्रेमसंबंध जुळून आले होते. त्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून १६ जून २०१८ रोजी तिच्या कॉलेजमध्ये जाऊन तेथून तिला त्याच्या गावी शिपोशी येथे घेऊन गेला. या मुलीला विविध ठिकाणी नेऊन त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते.पोलीस तपासादरम्यान झालेल्या वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी गरोदर असल्याचे पुढे आले. त्यानंतर तिच्या वडिलांनी लांजा पोलीस स्थानकात तक्रार दिली.पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी समीर जाधव याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास लांजा पोलीस स्थानकाच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव करत होत्या.
तपासात पोलिसांनी आरोपीला अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याचा निकाल पोक्सो विशेष न्यायालयाने जाहीर केला. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले.