खेड : तालुक्यातील मौजे शिवबुद्रुक येथील दिव्यांग व मतिमंद असलेल्या पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी मुराद इक्बाल मेटकर याला दहा वर्षे सक्तमजुरी व पीडितेला १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा खेड येथील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अनंत आवटे यांनी सुनावली. ही घटना १० नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला घडली.
सरकारी पक्षातर्फे अॅड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले. आरोपी मुराद इक्बाल मेटकर (वय ४०, रा. कोंडीवली, खेड) याने पीडितेच्या घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरूणीची आई व बहीण मोलमजुरी करून उपजीविका करतात. १० नोव्हेंबर रोजी त्या दोघी कामावरून घरी परतल्यानंतर त्यांच्या निदर्शनाला ही बाब आली. त्यांनी तत्काळ येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. सरकारी पक्षातर्फे अॅड. नलावडे यांनी एकुण १३ साक्षीदार तपासले.
सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्याची ही या आठवडयातील दुसरी घटना आहे. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास गावडे व परिक्षेत्र पोलीस उपाध्यक्ष डॉ. निलेश पांडे यांनी केला.या खटल्यात साक्षीदार अवधूत बर्वे, विशेष शिक्षिका सरिता टीकम यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या खटल्यादरम्यान साक्षीदारांना हजर ठेवण्यासाठी खेडचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, महिला पोलीस हवालदार पैरवी मर्चंडे, महिला पोलीस शिपाई पूनम ढवण यांनी मदत केली.