अरुण आडिवरेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन राज्य सरकारने संचारबंदी जाहीर केली आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात रिक्षा व्यवसायही बंद राहणार असल्याने त्यांच्यासाठी शासनाने मदतीचा हात दिला आहे. शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १०,९९२ परवानाधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
गतवर्षी करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला हाेता. अनेकजण केवळ रिक्षा व्यवसायावरच अवलंबून असल्याने घर चालवायचे कसे, असा प्रश्न व्यावसायिकांना पडलेला हाेता. रिक्षा व्यावसायिकांचे झालेले नुकसान पाहता सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात रिक्षा व्यावसायिकांचे नुकसान हाेऊ नये यासाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. या मदतीमुळे त्यांच्या ‘राेटी’चा प्रश्न मिटणार आहे.
लाॅकडाऊनमुळे रिक्षाचालकांवर उपासमार करण्याची वेळ आली आहे. रिक्षा व्यवसायच बंद ठेवल्याने करायचे काय? शासन मदत म्हणून दीड हजार रुपये देणार आहे. त्यामध्ये घर तरी चालेल का? मग इतर खर्च तर बाजूलाच राहिले आहेत. ही मदत तुटपुंजीच आहे.
- प्रभाकर खडपे, राजापूर
शासनाने मदत देऊ केली आहे. ही मदत कधी मिळेल तेव्हा मिळेल; पण ही मदत म्हणजे व्यावसायिकांची चेष्टाच आहे. आजच्या महागाईत ही मदत परवडणारी आहे का? भाजी, सिलिंडर, इंधन यांचे दर वाढतच आहेत. त्यामध्ये ही मदत किती पुरेशी पडणार आहे. त्यापेक्षा व्यवसाय सुरू करण्यास द्यावा.
- प्रमाेद वायंगणकर, रत्नागिरी
शासनाने दिलेली मदत ही अपुरी आहे. व्यवसाय पूर्णपणे बंद असून, केवळ दाेन सीटचीच परवानगी दिली आहे. ते न परवडणारे आहे. दर वाढविला तर प्रवाशांच्या राेषाला सामाेरे जावे लागते. शासन दीड हजार रुपये मदत देणार आहे; पण रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ताच तीन हजार रुपयांपर्यंत आहे. मग ही मदत पुरेल का? कर्जाचा हप्ता आणि घरखर्च यांचा ताळमेळ घालणे मुश्कील झाले आहे.
- मिलिंद चव्हाण, अध्यक्ष
रिक्षा चालक-मालक संघटना कडवई - तुरळ -चिखली
थेट खात्यात पैसे
शासनाने जाहीर केलेल्या मदतीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यातर्फे परवानाधारक रिक्षाचालकांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी शासनाकडे सादर केली जाणार असून, त्यानंतर रिक्षाचालकांच्या थेट खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
मदत अपुरी
अनेकांचा केवळ रिक्षा हाच व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. कर्जाचे हप्ते, विमा यासह कुटुंबीयांसाठी हाेणारा खर्च खूप आहे. त्यामानाने मिळणारी ही मदत खूपच अपुरी असल्याचा सूर रिक्षाचालकांमधून उमटू लागला आहे. ही मदत वाढविणे गरजेचे आहे.