खारलॅण्डच्या पाण्यामुळे ११५ माड पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:29 AM2021-05-01T04:29:22+5:302021-05-01T04:29:22+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील बंधाऱ्याच्या अर्धवट झालेल्या कामामुळे भरतीचे पाणी रहिवासी भागात शिरल्याने ग्रामस्थांचे नुकसान ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील बंधाऱ्याच्या अर्धवट झालेल्या कामामुळे भरतीचे पाणी रहिवासी भागात शिरल्याने ग्रामस्थांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर खारलॅण्ड विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. गुरुवारी सकाळी अधिकाऱ्यांनी माजी सरपंच निखिल बोरकर यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत पंचयादी घातली. यामध्ये ११५ पेक्षा अधिक माडाची झाडे तसेच केळी आणि आंबा कलमांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यावेळी बंधाऱ्यावरील उघडण्यात आलेली मोरी तत्काळ बंद करण्यात येईल, असे सांगितले.
तालुक्यातील वरवडे येथील खारलॅण्ड बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवून काम घेतलेला ठेकेदार गायब झाला. अर्धवट अवस्थेतील कामामुळे भरतीचे पाणी थेट रहिवासी भागात शिरले. मंगळवारी पहाटे भरतीचे पाणी ग्रामस्थांच्या घरापर्यंत पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांच्या वैयक्तिक मालमत्तेचे यामुळे नुकसान झाले. यामध्ये संतोष सत्यवान पाटील यांचे ३० माड, शंकर बोरकर यांचे २५, महानंदा बोरकर यांचे ४० माड, संदीप बोरकर यांचे २० माड आणि मयूर राणे यांची केळीची झाडे पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले. रहिवासी भागात पाणी भरल्याने रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाल्याने संबंधित ठेकेदार आणि खारलॅण्ड विभागाने तातडीने हे काम हाती न घेतल्यास प्रसंगी आंदोलन छेडू, असा इशारा येथील माजी सरपंच निखिल बोरकर यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर खारलॅण्डच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. बंधाऱ्याची मोरी तत्काळ बंद करण्यात येईल, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.