देवरुख : मागील अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवरुख एसटी आगाराने पेढांबेकडे जाणारी बस बंद केल्याने, इथल्या ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. माखजन खाडीपट्ट्यांलगतच्या गावांना जाणाऱ्या सर्व एसटी बस फेऱ्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी मावळंगे शाखाप्रमुख बाबू मोरे यांनी केली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्ट्यातील शेवटचे गाव पेढांबे असून, या ठिकाणी जाण्यासाठी १२ किलाेमीटरचे अंतर असून, इथल्या सामान्य लोकांना बाजारपेठेसह शेतीला लागणाऱ्या वस्तूंसाठी माखजन बाजार पेठेत यावे लागते, तसेच इथल्या पेढांबेसह या मार्गावरील अनेक गावांतील ग्रामस्थांना पायी प्रवास करावा लागत आहे. सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे. लस घेण्यासाठी ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी २४ किलाेमीटरचा प्रवास चालत करावा लागतो, अन्यथा खासगी वाहन केल्यास वाहनधारकाला तो म्हणेल ती रक्कम द्यावी लागते. त्यातच सध्या शेतीचा हंगाम सुरू असून, शेतीसाठी लागणारे साहित्य व संसारोपयोगी वस्तूसाठी लागणारे साहित्य लागल्यास माखजन बाजारपेठेशिवाय पर्याय नसल्याने चालतच जावे लागते.
या मार्गावरील लोकांना शासकीय कामासाठी चिपळूण, सावर्डे, देवरुख, रत्नागिरी आदी गावांना जावे लागते. मात्र, एसटीची फेरी नसल्याने मनस्ताप हाेत आहे. माखजन, पेढांबे या मार्गावर कासे, असावे, नारडुवे, खेरशेत, वीर आदी गावे आहेत. मात्र, सध्या या मार्गावर एकही गाडी सुरू नसल्याने अनेकांचा खोळंबा होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी बाबू माेरे यांने केली आहे.