नातेवाईकांना लुटणाऱ्याकडून १२ लाखाचे दागिने जप्त; तीन चोऱ्यांप्रकरणी कारवाई 

By संदीप बांद्रे | Published: January 3, 2024 07:46 PM2024-01-03T19:46:15+5:302024-01-03T19:46:34+5:30

चोरट्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.

12 lakh jewels seized from relatives who robbed them; Action taken in case of three thieves | नातेवाईकांना लुटणाऱ्याकडून १२ लाखाचे दागिने जप्त; तीन चोऱ्यांप्रकरणी कारवाई 

नातेवाईकांना लुटणाऱ्याकडून १२ लाखाचे दागिने जप्त; तीन चोऱ्यांप्रकरणी कारवाई 

चिपळूण : काका, बहिण व आत्तेच्या घरी डल्ला मारणाऱ्या कापसाळ येथील ओंकार अनिल साळवी या तरूणाला येथील पोलिसांनी तीन चोरी प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून तब्बल १२ लाखाचे दागिने जप्त केले आहेत. विशेष म्हणजे या चोरट्याने हे दागिने सोने तारण करणाऱ्या एका खासगी फायनान्स कंपनीत तारण ठेवून सुमारे २८ लाखाच्या कर्जाची उचल केली होती. या चोरट्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र बुधवारी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली आहे. 

नातेवाईकांकडे राहिल्यानंतर त्यांच्याशी जवळीक साधून त्याचा फायदा ओंकार साळवी नेहमी उठवत होता. पाहूणा म्हणून आलेला ओंकार घरच्याप्रमाणे सर्वत्र राहत होता. मात्र त्या कालावधीत त्याचा डोळा त्या-त्या घरातील दागिन्यांवर होता. दागिने कुठे ठेवले जातात, कपाटाची चावी कुठे ठेवली जाते, याची पुरेपुर माहिती घेतल्यानंतर घरी कोणी नसताना तो दागिन्यांवर हात मारत होता. त्यातून त्याने नात्यातील काका, बहिण, आत्या यांच्या घरी चोरी केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर कापसाळ गावी देखील त्याने चोरी केल्याचे प्रकार उघडकीस येताच त्याला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची कसून चौकशी केल्यानंतर चिपळूण शहरातील एका सोने तारण करणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीत चोरीचे दागिने गहाण ठेवून २८ लाखाच्या कर्जाची उचल केल्याची  धक्कादायक प्रकार पुढे आला. पोलिसांनी तत्काळ संबंधीत बँकेकडून हे दागिने जप्त केले.
 
सुमारे १२ लाख ५० हजार रूपये इतक्या किंमतीचे दागिने त्याने चोरले असून त्यातील ११ लाख ३३ हजार रूपयांचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. कापसाळ दुकानखोरी येथील अमोल साळवी यांचे ५ लाख ८ हजाराचे दागिने, जयश्री अवधूत साळवी यांचे ५ लाख ३६ हजार, तर स्नेहल सचिन सावंत हिचे २ लाख ३६ हजाराचे दागिने चोरीला गेले होते. हे दागिने ओंकार अनिल साळवी (२८, रा. दुकानखोरी, कापसाळ) यानेच चोरल्याचे स्पष्ट झाले. नातेवाईकांच्या घरातच चोरी केल्या प्रकरणी ओंकार साळवीला मुंबईत साकीनाका पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणी पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय पाटील, पोलिस उपनिरीक्षक शाम आरमाळकर, पूजा चव्हाण, अरूण जाधव, पोलिस हवालदार  संतोष शिंदे, पाडुरंग जवरत, वृक्षाल शेटकर, संदीप मांडके, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद कदम, गणेश पडवी, कृष्णा दराडे यांनी कामगिरी पार पाडली.
 

Web Title: 12 lakh jewels seized from relatives who robbed them; Action taken in case of three thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.