चिपळुणात १२ हजार टन कचऱ्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:33 AM2021-07-30T04:33:50+5:302021-07-30T04:33:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : अख्खी बाजारपेठच २८ ते ३० तास पाण्यात असल्याने सर्व दुकानांमधील विक्रीचे साहित्य खराब झाले ...

12,000 tons of waste challenged in Chiplun | चिपळुणात १२ हजार टन कचऱ्याचे आव्हान

चिपळुणात १२ हजार टन कचऱ्याचे आव्हान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : अख्खी बाजारपेठच २८ ते ३० तास पाण्यात असल्याने सर्व दुकानांमधील विक्रीचे साहित्य खराब झाले आहे. हे साहित्य, घराघरातून वाहून गेलेल्या गोष्टी आणि पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेला कचरा ही आता चिपळूणकरांसमोरील खूप मोठी समस्या झाली आहे. आतापर्यंत १५०० टन कचरा उचलण्यात आला असला तरी अजूनही १२ हजार टन कचरा उचलण्याचे आव्हान चिपळूणकरांसमोर आहे. त्यासाठी अहोरात्र काम सुरू असून प्रशासनाच्या मदतीला अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे.

येथे दि. २२ व २३ जुलैला आलेल्या महापुरात चिपळूणचे अतोनात नुकसान झाले. संपूर्ण बाजारपेठ व परिसर उद्ध्वस्त झाला आहे. पुरासोबत शहर परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल वाहून आला असून, अजूनही चिखल काढण्याचे काम सुरू आहे. चिखलामुळे साफसफाईच्या कामात अडचणी येत असून, येथील व्यापारी व नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच नगर परिषद सफाई कामगारांनाही चिखल उपसतानाच नाकीनऊ येत आहे. अशा परिस्थितीत काडसिद्धेश्वर सांप्रदाय, आप्पासाहेब धर्माधिकारी संस्थानचे श्री सदस्य तसेच ठाणे महानगर पालिका, मुंबई महानगर पालिका, रत्नागिरी नगर परिषद येथील सफाई कामगार या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

नगर परिषदेच्या ८४ सफाई कामगारांसोबत सुमारे ३ हजार नागरिक सफाईच्या कामात व्यस्त आहेत. त्यांच्या मदतीला जेसीबी व एकूण ७९ डंपर कचरा उचलण्यासाठी अहोरात्र राबत आहेत. तरीदेखील एकूण कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता अजूनही महिनाभर ही मोहीम राबवावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

आतापर्यंत शहरातील विविध भागातून १५०० टन कचरा उचलण्यात आला असून तो शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पाच्या जागेत नेण्यात आला आहे. तेथे १० एकर जागा उपलब्ध असून आतापर्यंत नेलेल्या कचऱ्याने बहुतांशी भाग व्यापला आहे. त्यामुळे उर्वरित कचरा टाकायचा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी खेर्डी औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या जागेत कचरा टाकण्याचा विचार केला जात आहे.

सद्यस्थितीत दररोज ४०० टन कचरा उचलला जात आहे. परंतु अजूनही १२ हजार टन कचरा शिल्लक असल्याने ही क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी इतर भागातून आणखी मदत घेण्याचा विचार सुरू आहे. दिवसाला किमान १ हजार टन कचरा उचलला गेला तरच ही परिस्थिती वेळेत नियंत्रणात येऊ शकते. आता पूर ओसरल्याला सहा दिवस झाल्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी वाढू लागली आहे. त्यातून रोगराईचा पसरण्याचा धोका आहे. त्यासाठी पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम व भास्कर जाधव यांच्यामार्फत जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

....................

मोहिमेत मुंबईची मोठी साथ

कचरा उचलण्यासाठी मुंबई व ठाणे महानगर पालिकेचे सफाई कामगार व अधिकारी गेले आठ दिवस येथे सातत्याने राबत आहेत. चिखल हटविण्यासाठी महानगर पालिकेकडून अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करण्यात आल्या असून, त्याचा चांगला उपयोग होत आहे. भविष्यात या महानगरपालिकांमार्फत आणखी काही यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे.

.................

नागरिकांच्या गर्दीमुळे

साफसफाई मोहिमेत अडथळा

सध्या बाजारपेठेत महापुरात भिजलेला माल व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेरच टेबल मांडून विक्रीसाठी काढला आहे. १०० ते १५० रूपये दराने कपडे, भांडी व अन्य साहित्य विक्रीसाठी ठेवल्याने खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे शहरातील मदतकार्यासाठी आलेल्या यंत्रणेला त्रास होऊ लागला आहे. वाहतुक कोंडीमुळे कचऱ्याच्या गाड्यादेखील तासनतास अडकून राहत असल्याने वेळेत कचरा उचलला जात नाही.

आतर्य्तंत उचललेला कचरा

१५०० टन

एकूण कचरा

१२ हजार टन

कचऱ्याची वाहने

७९

सफाई कामगार

८४

स्वच्छतेसाठी लोकसहभाग

३०००

Web Title: 12,000 tons of waste challenged in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.