पवारसाखरीतील अक्षय पवार यांचे १५ राेजी उपाेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:35 AM2021-08-13T04:35:17+5:302021-08-13T04:35:17+5:30
गुहागर : तालुक्यातील पवारसाखरी येथील ओझर नदीमधील गाळ काढणे आणि संरक्षक बांध घालण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अक्षय ...
गुहागर : तालुक्यातील पवारसाखरी येथील ओझर नदीमधील गाळ काढणे आणि संरक्षक बांध घालण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अक्षय पवार यांनी केला होता. या कामाची चाैकशी व्हावी तसेच या कामाचे मूल्यमापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जूनपासून केलेल्या पत्रव्यवहाराला शासनाकडून उत्तर न मिळाल्याने अक्षय पवार यांनी १५ ऑगस्ट राेजी उपाेषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी संबंधित विभागाकडे पाठवले आहे.
साखळी बुद्रुक/खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ओझर नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाला १४ व्या वित्त आयोगातून ४ लाख ५९ हजार ६७३ रुपयांचा निधी मंजूर झाला होता. हे काम घाणेखुंट (ता. खेड) येथील सदगुरू समर्थ मजूर सहकारी संस्थेला देण्यात आले होते. याच कामात हरिश्चंद्र पवार ते वडाचा पायथा मोरी अशी दोनशे मीटरची संरक्षक भिंत बांधण्याचा समावेश होता. हे काम केल्यानंतर संरक्षक भिंत दोनवेळा कोसळली आहे. या कामाबाबत अक्षय पवार यांनी १ जून रोजी आक्षेप घेतला होता. १४ व्या वित्त आयोगातील निधीचा ग्रामसभेचा ठराव लागतो, तसा ठराव न करता हा निधी वापरण्यात आल्याचा आराेप त्यांनी केला आहे.
या कामाचे मूल्यांकन करताना पंचायत समितीच्या अभियंत्यांनी तीनपट अधिक मूल्यांकन केले आहे. इतके अधिक पैसे ठेकेदाराला देऊ नयेत, काम निकृष्ट दर्जाचे केल्याने पावसाळ्यापूर्वीच बंधारा कोसळला, याबाबत आक्षेप न घेता ग्रामसेवकांनी हे काम पुन्हा करून घेतले. मात्र, तरीही पुन्हा बंधारा कोसळला. त्यामुळे स्वतंत्र एजन्सीतर्फे कामाचे अंदाजपत्रक तयार करावे, अधिक मूल्यांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, ठेकेदाराने केलेल्या कामाचे मूल्यांकन व्हावे, त्याला देण्यात आलेल्या अधिकच्या पैशांची वसुली व्हावी, अशी मागणी अक्षय पवार यांनी केली होती. मात्र, या पत्रावर शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे त्यांनी १५ ऑगस्ट राेजी उपाेषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, साखरे खुर्द बुद्रुक ग्रामपंचायत आणि पोलीस स्थानक यांना पाठवले आहे.