लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेल्या चार वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातून १८५ अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. या मुलींचा शोध घेण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. पळून गेलेल्या मुलींपैकी केवळ एका मुलीचा शोध लागलेला नाही.
मुलीचा ओळखीचा मित्र असो किंवा काही वेळा नातेवाईकसुद्धा या अपहरण प्रकरणात सहभागी असल्याचे अनेकदा समोर येते. कायद्याने मुली अल्पवयीन असल्यामुळे अशा प्रकारे अपहरण झालेल्या मुलींचा शोध पोलिसांना घ्यावाच लागतो.
२०१८ साली ६६ मुली, २०१९ साली ५४, २०२० साली ३१ मुली पळून गेल्या होत्या. या मुलींना शोधण्यात पोलिसांना १०० टक्के यश आले आहे. २०२१ मध्ये ३४ मुली पळून गेल्या; यापैकी ३३ मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले होते. उर्वरित एकीचा शोध लवकर लागेल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना
२०१८ ६६
२०१९ ५४
२०२० ३१
२०२१ ३४
मुली चुकतात कुठे?
१) सध्या सोशल मीडियाचा जास्त वापर होऊन त्यामधून ओळख होण्याचे प्रमाण वाढते. त्यातून चॅटिंगचे प्रमाण वाढते व त्यातूनच चुकीचे प्रकार घडतात. कोणतीही खात्री न करता रिवेस्ट स्वीकारू नये. आर्थिक आमिषाला बळी पडतात.
२) अल्पवयीन वयात असलेले आकर्षण. समोरच्याचे वागणे, कपडे पाहून त्याच्याशी ओळख करून मैत्री करावी असे वाटते. या मैत्रीतून आकर्षण निर्माण होऊन पुढे अनैतिक संबंध होतात. मात्र नंतर ते धोका देतात.
३) अल्पवयीन मुलींना चांगल्या - वाईटाची समज नसते. घरातील लोक जे सांगतात ते पटत नसते. घरातील लोकांची किटकिट नको असते. त्यामुळे या वयातील मुलांना बंधनं नको असतात. स्वच्छंदी जगणं हवं असतं व त्यामधूनच पळून जाण्याचे प्रकार घडतात.