राजापूर : सन २०२०-२१ च्या पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यासाठी आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. पाणीटंचाई कार्यक्रमांतर्गत नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्तीसाठी राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी २ कोटी ८ लाख ०९ हजार ८९० ची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
त्यामध्ये राजापूर तालुक्यासाठी १ कोटी १८ लाख ४९ हजार ९६५ तर लांजा तालुक्यासाठी ६५लाख ७४ हजार ७४१ व साखरपा विभागासाठी २३ लाख ८५ हजार १८४ मंजुरी मिळाली आहे. डिसेंबरनंतर राजापूर मतदारसंघामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे. ही पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने पाणी टंचाईग्रस्त गाव व वाडांचा कृती आराखडा तयार करून आमदार राजन साळवी यांनी टंचाईग्रस्त गावाचे मुदतीत येणारे सर्वच्या सर्व प्रस्ताव मंजूर करून घेण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. आमदार राजन साळवी यांच्या सूचनेनुसार पाण्याची तीव्र टंचाई दूर करण्याच्या दृष्टीने मुदतीमध्ये असलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.