चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात, २५ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:31 AM2021-04-01T04:31:42+5:302021-04-01T04:31:42+5:30
दापोली : शिमगोत्सव साजरा करून परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांच्या एस.टी. बसला अपघात होऊन २५ प्रवासी जखमी झाले. सुदैवाने ...
दापोली : शिमगोत्सव साजरा करून परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांच्या एस.टी. बसला अपघात होऊन २५ प्रवासी जखमी झाले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. पण बस अजून थाेडी लांब जाऊन कलंडली असती, तर भारजा नदीत गेली असती आणि अपघाताचे स्वरूप अधिक तीव्र बनले असते.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली केळशी येथे उटंबर - मुंबई गाडीला सकाळी अपघात झाला. सर्व जखमींवर केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार केले जात आहेत. समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्यासाठी बस रस्त्याच्या खाली घेतल्याचे चालकाचे म्हणणे आहे. परंतु या चालकाने मद्यपान केले असल्याचे समोर आले आहे. या चालकाने बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप लोकांनी केला आहे.
अपघातग्रस्त गाडी केळशी येथे उभी करून ठेवण्यात आली आहे. उटंबर ते मुंबई अशी ही बस सकाळी मार्गस्थ झाली. शिमगोत्सव आटोपून चाकरमानी या बसमधून परत मुंबईकडे जात होते. केळशी गावानजीक ही बस रस्त्याच्या खाली गेली. त्यामुळे प्रवाशांनी आरडाओरडा केला. या आवाजामुळे केळशी गावातल्या लोकांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली. जखमी प्रवाशांना तत्काळ केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. बस अजून थोडी पुढे गेली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. कारण पुढे एका बाजूला भारजा नदी आहे. त्या नदीत बस पलटी झाली असती, तर मोठा अनर्थ घडला असता.
या अपघातानंतर बसचा वाहक पसार झाला असून, चालकाला मात्र जमावाने ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले आहे. अपघाताची माहिती कळताच पोलीस तसेच दापोली एसटी आगाराचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.
...................
फोटो आहेत.