मतदार नोंदणी विशेष मोहिमेत २ हजार ७०५ नवीन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:31 PM2019-02-26T12:31:55+5:302019-02-26T12:33:08+5:30
रत्नागिरी : रत्नागिरीत २३ व २४ फेब्रुवारी या कालावधीत मतदार नोंदणी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत २ हजार ...
रत्नागिरी : रत्नागिरीत २३ व २४ फेब्रुवारी या कालावधीत मतदार नोंदणी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत २ हजार ७०५ नवीन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०१९साठी अद्याप मतदार म्हणून नोंदणी केलेली नाही, अशांना मतदार नोंदणीसाठी पुन्हा संधी मिळावी म्हणून निवडणूक आयोगाने शनिवार व रविवार या सुट्यांच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम आयोजित केली होती. जिल्ह्यातील १ हजार ६९९ मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहिले होते.
गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात नव्याने ३४ हजारांहून अधिक तरुण मतदारांनी नावनोंदणी केली आहे, तर जिल्ह्यातील एकूण मतदारांच्या संख्येत ६७ हजार ८९ने वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदारयादी दिनांक ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ रोजी एकूण मतदारांची संख्या १२ लाख २८ हजार ४८९ एवढी होती, तर मतदार पुनरिक्षण कार्यक्रमानंतर जिल्ह्यात नव्याने मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. १ जानेवारी २०१९च्या अंतिम यादीनुसार एकूण मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, आता १२ लाख ९५ हजार ५७८ मतदार झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या मतदारसंख्येत यावेळी ६७,०८९ नवीन मतदारांची वाढ झाली आहे.
मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत दाखल झालेल्या अर्जांमध्ये १ हजार ६६३ जणांनी नाव नोंदणी केली आहे. ४०७ जणांनी नाव वगळण्यासाठी अर्ज दिले आहेत. ५८६ जणांनी दुरूस्तीसाठी, तर ४९ जणांनी भागातून नाव बदलण्यासाठी अर्ज केल्याची माहिती सुनील चव्हाण यांनी दिली. या अर्जांची तपासणी करून यादीत नावे समाविष्ट करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया ७ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.