रत्नागिरी जिल्ह्यात ३ हजार ८४२ अहवाल निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 10:19 PM2020-05-17T22:19:20+5:302020-05-17T22:20:00+5:30
जिल्ह्यात ४ हजार ४५४ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते़ त्यापैकी ३ हजार ८४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ तर शनिवारपर्यंत ८६ नमुन्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते.
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वाढता आलेख जिल्हावासियांसाठी धोकादायक असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत घेण्यात आलेल्या स्वॅबच्या नमुन्यापैकी ३ हजार ८४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ ही बाबही जिल्हावासियांसाठी दिलासादायक आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेसह शिक्षक, केंद्रप्रमुख, आशा व अन्य कर्मचारी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जिवाची बाजी लावून काम करीत आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असतानाही ९० टक्के कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत़ तर १० टक्के रुग्ण खेडमधील कळंबणी व चिपळुणातील कामथे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आहे.
जिल्ह्यात ४ हजार ४५४ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते़ त्यापैकी ३ हजार ८४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ तर शनिवारपर्यंत ८६ नमुन्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तसेच २ स्वॅब प्रयोगशाळेतून नाकारण्यात आले होते़ आतापर्यंत १४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले़ तर ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त चाकरमानी आले आहेत़ त्यामध्ये अनेक जण छुप्या मार्गाने आल्याने ते जिल्हावासियांसाठी त्रासदायक ठरत आहेत. जिल्ह्यातील ८६ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७५ रुग्ण मुंबईकर असल्याने चाकरमान्यांमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.