चिपळूण : श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या ३ हजारांवर सेवेकऱ्यांनी गुरुवारी चिपळूणच्या बाजारपेठेत स्वच्छता मोहीम राबवली. सकाळी १० ते सायंकाळी ६पर्यंत सर्व गाळ, कचरा उचलून बाजारपेठ चकाचक केली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
या मोहिमेत पुणे व सातारा जिल्ह्यातील सेवेकरी सहभागी झाले होते. सकाळी नऊपासून सर्व सेवेकरी चिंचनाका परिसरात एकत्र आले. दहा वाजता आमदार शेखर निकम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या अभियानाला सुरूवात करण्यात आली. त्यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्याच्या गौरव केला. संस्थानचे हे फार मोठे काम असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी भाजपचे आमदार प्रसाद लाड, चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते आदींनी संस्थानच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ही मोहीम सुरू असतानाच राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तेथे भेट दिली. त्यांनीही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या या कार्याचे कौतुक केले.
त्यानंतर स्वच्छतेचे काम सुरू झाले. सेवेकऱ्यांची वेगवेगळ्या गटांत विभागणी करण्यात आली व बाजारपेठेतील भाग त्यांना स्वच्छतेसाठी वाटून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सफाई केली. बहाद्दर शेख नाका ते काविळतळी, काविळतळी ते मार्कंडी, मार्कंडी ते नगर परिषद, नगर परिषद ते महालक्ष्मी नगर, शंकरवाडी, चिंचनाका ते पद्या थिएटर, वडार कॉलनी, राहुल गार्डन अशा भागांतील रस्त्यांवर गाळ साचला होता, कचरा पडला होता. तो त्यांनी काढून संपूर्ण स्वच्छता केली.
गाळ व कचरा मोठ्या प्रमाणात पडला असल्याने गेले चार दिवस पावसाची उघडीप मिळूनही पुरेशी स्वच्छता झाली नव्हती. ते समुहानेच व्हायला हवे होते. या पार्श्वभूमीवर संस्थानचे ३००० सेवेकरी येथे दाखल झाले व त्यांनी स्वच्छता केली. त्यांनी एकत्र केलेला कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेने डम्पर व ट्रॅक्टर दिले होते. त्याच्या सहाय्याने सारा कचरा, गाळ, भिजलेले साहित्य उचलण्यात आले. सर्व सेवेकऱ्यांसाठी येथील सेवा समितीतर्फे खिचडीची व्यवस्था करण्यात आली होती. २३ जुलैपासून येथे रोज संस्थानचे एक हजार सेवेकरी वेगवेगळ्या भागात स्वच्छता करीत आहेत. अनेक घरे स्वच्छ करण्यास मदत करीत आहेत. पूर ओसरत असताना पहिले दोन दिवस अन्नाची पाकिटे त्यांनी वाटली. त्याचप्रमाणे एक दिवस अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. संस्थानच्या रुग्णवाहिकाही सेवाकार्यात येथे कार्यरत आहेत.