रत्नागिरी : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे आणखी ४६९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ६६,५१० झाली आहे. तर कोरोनाने १० रुग्णांचा बळी गेला असून, मृत्यूची संख्या १,९०० झाली आहे.
आराेग्य विभागाकडून जिल्ह्यात ५,४९० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आरटीपीसीआरचे २६३ तर अँटिजनचे २०६ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. मंडणगड तालुक्यात ४ रुग्ण, दापोलीत १९, खेडमध्ये २८, गुहागरात २०, चिपळुणात १३३, संगमेश्वरात २५, रत्नागिरीत १४९, लांजात ४३ आणि राजापुरातील ४८ रुग्णांचा समावेश आहे. चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये बाधित रुग्ण वाढले आहेत. रत्नागिरी तालुक्याचा सर्वात जास्त पॉझिटिव्हिटी दर ११.२२ टक्के आहे.
जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, राजापूर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी २ रुग्ण तर दापोली, गुहागर, खेड, संगमेश्वरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित मृतांचा दर २.८६ टक्के तर रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ झाली असून तो ९१.७ टक्के आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण ३,६०९ आहेत. गृहविलगीकरणात १,४०९ रुग्ण असून संस्थात्मक विलगीकरणात २,२०० रुग्ण आहेत.
-----------------
तब्बल १,२६८ रुग्णांची काेराेनावर मात
जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या वाढत असतानाच काेराेनातून बरे हाेणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. आराेग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी दिवसभरात १,२६८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६०,५७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा रुग्ण बरे हाेण्याचा दर ९१ टक्के इतका आहे.