रत्नागिरी जिल्ह्यात श्रमदानातून पूर्ण झाले ५२३ बंधारे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 06:22 PM2024-12-06T18:22:06+5:302024-12-06T18:22:30+5:30
रत्नागिरी : ‘ पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी बंधारे उभारले जातात. यंदाही श्रमदानातून ...
रत्नागिरी : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी बंधारे उभारले जातात. यंदाही श्रमदानातून ५२३ बंधारे बांधण्यात आले असून, त्यामध्ये लाखो लिटर पाणी साठले आहे.
उशिरापर्यंत पाऊस आणि लांबलेले बंधारे, त्यामुळे जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईही लांबण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गावातून वाहणारे नाले, वहाळ आणि उपनद्या यावर तात्पुरते बंधारे बांधून त्या पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. श्रमदानातून हे बंधारे उभारले जात आहेत. त्यामध्ये कच्चे, वनराई आणि विजय बंधाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी ८ हजार ६६५ बंधाऱ्यांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.
बंधाऱ्यांतील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी, कपडे धुणे, गाई-गुरांसाठी केला जातो. तसेच बंधारा बांधल्यानंतर अडलेले पाणी जमिनीत जिरते आणि किनाऱ्यावरील विहिरींची पाणी पातळीही वाढण्यास मदत होते.
एप्रिल, मे महिन्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात पाणी पातळी कमी होते. काही ठिकाणी विहिरी पूर्णतः कोरड्या पडतात. त्यावेळी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो.
बंधाऱ्यातील पाण्यामुळे अनेक विहिरींचे पाणी उशिरापर्यंत वापरण्यास मिळत आहे. काही गावांमध्ये कच्चे बंधारे विहिरींची पाणी पातळी वाढविण्याच्या उद्देशानेच उभारले जातात. गेल्या दोन वर्षांत गावागावांत पाणी योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
तालुका - कच्चे बंधारे - वनराई बंधारे - विजय बंधारे
- मंडणगड - १७ - ०६ - ००
- दापोली - ०० - १० - ८६
- खेड - ३५ - ०२ - ०९
- गुहागर - ०० - १९ - ११
- चिपळूण - ९५ - ०० - २४
- संगमेश्वर - २५ - १० - ०८
- रत्नागिरी - २६ - १६ - ००
- लांजा - ६५ - १५ - १८
- राजापूर - १७ - ०६ - ००
- एकूण - २८० - ८४ - १५६