रत्नागिरीमध्ये एलईडीलाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या ९ बोटी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 05:52 PM2018-02-23T17:52:09+5:302018-02-23T17:52:09+5:30
एलईडी लाईटच्या सहाय्याने होणाऱ्या मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने रत्नागिरी व जयगडच्या परिसरात आज कारवाई केली. या कारवाईत एलईडी लाईट साधनसामुग्री आढळून आलेल्या ९ आणि बेकायदेशीरपणे पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करणाऱ्या २ अशा ११ बोटी जप्त करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी : एलईडी लाईटच्या सहाय्याने होणाऱ्या मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने रत्नागिरी व जयगडच्या परिसरात आज कारवाई केली. या कारवाईत एलईडी लाईट साधनसामुग्री आढळून आलेल्या ९ आणि बेकायदेशीरपणे पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करणाऱ्या २ अशा ११ बोटी जप्त करण्यात आल्या आहेत.
एलईडी लाईटद्वारे करण्यात येणारी मासेमारी ही मत्स्यसाठ्यावर अत्यंत घातक परिणाम करणारी आहे. केंद्र शासनाच्या १० नोव्हेंबर २०१७च्या आदेशानुसार एलईडी लाईटद्वारे मासेमारी करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
एलईडी लाईटच्या प्रकाशामुळे मासेमारी क्षेत्रातील सर्व मासे आकर्षित होऊन एकाच ठिकाणी जमा होतात. हा संपूर्ण साठा एकाच जाळ्याद्वारे पकडला जातो. त्यामुळे असे साठे संपत गेल्यास भविष्यात माशांचे उत्पादन कमी होऊन मत्स्यदुष्काळाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे एलईडी लाईटद्वारे होणाऱ्या मासेमारीला प्रतिबंध घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून गस्त घालण्यात येत आहे.
रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गस्तीदरम्यान आढळून येणाऱ्या अवैध मासेमारीबाबत कारवाई करण्यासाठी तटरक्षक दल (कोस्ट गार्ड) आणि पोलिसांना मत्स्यव्यवसाय विभागाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. रत्नागिरीचे मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त आ. बा. साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील परवाना अधिकाऱ्यांच्या पथकाच्या गस्तीदरम्यान अवैधरित्या मासेमारी होत असल्याचे आढळून आल्याने कारवाई करण्यात आली.
मासेमारी नौंकाचे समुद्रातील नेमके ठिकाण आणि हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी व्हीटीएस बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या नौकांच्या मालक आणि चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत या नौकांना देण्यात आलेला परवाना रद्द करण्याचे आदेश रत्नागिरीच्या परवाना अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौका
उन्मे कुलसुंब (आयएनडी/एमएच/४/१५३६), खतीजा- सानिया (आयएनडी/एमएच/४/एमएम/१५२५), सुफीया आयशा (आयएनडी/एमएच/४/एमएम/१४७०), सुलतान जमान (आयएनडी/एमएच/४/एमएम/६३२), एम साहील एम राहील (आयएनडी/एमएच/४/एमएम/३३९०), श्री विघ्नहर्ता गजानन (आयएनडी/एमएच/१/एमएम/६५७), अमिना अजीजा (आयएनडी/एमएच/४/एमएम/१२३९), सईम महम्मद रजीन (आयएनडी/एमएच/४/एमएम/१७४६), काळबादेवी एक (आयएनडी/एमएच/५/एमएम/३२९१) या नौकांवर जनरेटर आणि एलईडी साधनसामुग्री आढळून आली. या नौका जनरेटर आणि एलईडी साधनसामुग्रीसह जप्त करण्यात आल्या आहेत.
पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करणाऱ्या नौका
खलाखी (आयएनडी/एमएच/४/एमएम/१५६५) ही व्हीटीएस (व्हेसल ट्रॅकींग सिस्टीम) यंत्रणा नसलेली बोट आणि जरिमरी तिसाई (आयएनडी/एमएच/१/एमएम/३२३७) ही परवाना तसेच मालकीबाबतचा योग्य पुरावा नसलेली नौका पर्ससीन जाळ्याने मासेमारी करत असताना आढळून आल्याने जप्त करण्यात आली.