रत्नागिरीत ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय होणार, सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला मोठा निर्णय

By मनोज मुळ्ये | Published: February 12, 2024 05:21 PM2024-02-12T17:21:17+5:302024-02-12T17:21:53+5:30

रत्नागिरी : राज्यात १३ ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालयाचा वापर सुरू असल्याने या १३ ठिकाणी ५०० खाटांचे जिल्हा ...

A 500 bed district hospital will be built in Ratnagiri, the public health department has taken decision | रत्नागिरीत ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय होणार, सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला मोठा निर्णय

रत्नागिरीत ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय होणार, सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला मोठा निर्णय

रत्नागिरी : राज्यात १३ ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालयाचा वापर सुरू असल्याने या १३ ठिकाणी ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यात रत्नागिरी जिल्ह्याचाही समावेश आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव सरकारला दिला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यासाठी राज्यात १३ ठिकाणी जिल्हा रुग्णालये ताब्यात घेण्यात आली आहेत. या १३ ठिकाणी ५०० बेड्सची नवीन जिल्हा रुग्णालये सुरू करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केला आहे.

यासाठी ७,८०० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी यावर्षी १,३०० कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी रुग्णालय ही सर्वात पहिली महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने परवानगीसाठी अर्ज करताना जिल्हा रुग्णालये त्यात दाखवली होती. सध्या ज्या जिल्ह्यातील रुग्णालये वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी घेण्यात आली, त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालये नाहीत.

त्यामुळे तेथे आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यावर मात करण्यासाठी नवी जिल्हा रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कळवा आणि नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयासारख्या घटना टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यावर सविस्तर चर्चाही झाली आहे.

जिल्ह्यातील बहुसंख्य सर्वसामान्य लोकांना जिल्हा रुग्णालयाचाच आधार असतो. इतर तालुक्यात अत्यवस्थ झालेल्या रुग्णांनाही जिल्हा रुग्णालयात आणले जाते. सर्वसामान्य लोकांसाठी ही व्यवस्था अत्यंत महत्त्चाची आणि गरजेची आहे. त्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या ठिकाणी होणारे रुग्णालये

वैद्यकीय शिक्षण विभागाने १३ जिल्हा रुग्णालये स्वतःकडे घेतली आहेत. त्यामध्ये रत्नागिरीसह अलिबाग (रायगड), बारामती (पुणे), सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, धाराशिव, गोंदिया, चंद्रपूर, नंदुरबार आणि जळगाव येथील जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.

Web Title: A 500 bed district hospital will be built in Ratnagiri, the public health department has taken decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.