एक लाखाचे ४ लाख वसूल; चिपळुणात सावकारीप्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल
By संदीप बांद्रे | Published: January 2, 2024 03:51 PM2024-01-02T15:51:08+5:302024-01-02T15:52:01+5:30
चिपळूण : दोन दिवसांपूर्वी एका महिलेला सावकारांनी 90 हजार रूपयांच्या कर्जापोटी तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांची लूट सावकारांनी ...
चिपळूण : दोन दिवसांपूर्वी एका महिलेला सावकारांनी 90 हजार रूपयांच्या कर्जापोटी तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांची लूट सावकारांनी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. ही घटना ताजी असतानाच अनधिकृत सावकारीचा आणखी एक गुन्हा उघड झाला असून याप्रकरणी चिपळूणातील दोघांविरुद्ध दाखल झाला आहे. गरजेसाठी एक लाख रुपये घेतलेल्या व्यक्तीकडून अनधिकृत सावकारी करणाऱ्याने तब्बल चार लाख २५ हजार इतकी मोठी रक्कम वसूल केली. सावकाराच्या या जाचाला कंटाळून संबंधित व्यक्तीने चिपळूण पोलिस स्थानकात तक्रार दिल्यानंतर सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणी फिरोज म्हैसकर, रोहित नारकर (दोघेही रा. चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. पोसरे येथील सुशांत मोहिते यांनी यासंदर्भात चिपळूण पोलिस स्थानकात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीनूसार २२ डिसेंबर २०२२ ते २१ जुलै २०२३ रोजी या कालावधीत हा प्रकार घडला आहे. संशयित आरोपी फिरोज म्हैसकर हा गेली काही महिने पोसरे परिसरात सावकारी धंदा करीत होता. तो गरजू लोकांकडून पठाणी व्याजाप्रमाणे व्याज वसूल करत होता. मोहिते याने त्याच्याकडून पत्नीला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करताना एक लाख रुपये कर्ज म्हणून घेतले होते. त्या बदल्यात त्याने मोहिते या्च्याकडून तब्बल ४ लाख २५ हजार रुपये वसूल केले.
पैसे देण्यास उशिर झाला म्हणून म्हैसकर आणि रोहित नारकर हे दोघे एकमेकांच्या संगनमताने फिर्यादी मोहिते याला शिवीगाळ, दमदाटी करत होते. त्याच्या घरी जाऊन पैशासाठी तगादा लावत होते. दोघांच्या जाचाला कंटाळून मोहिते यांनी चिपळूण पोलिस स्थानकात तक्रार दिली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रविंद्र शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हैसकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या दोघांवर भा.दं.वि. कलम ४२०, ४०, ३८४, ५०४, ५०६, ३४, महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४ चे कलम ३९, ४८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.