गॅस गळती होऊन कंपनीत स्फोट; हातखंब्यातील तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 06:05 PM2024-12-06T18:05:25+5:302024-12-06T18:05:49+5:30
रत्नागिरी : ओडिशातील एका कंपनीत गॅस गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा तारवेवाडी येथील महेश गोविंद घवाळी (३७) ...
रत्नागिरी : ओडिशातील एका कंपनीत गॅस गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा तारवेवाडी येथील महेश गोविंद घवाळी (३७) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे हातखंबा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी सायंकाळी या तरुणाचा मृतदेह रत्नागिरीत आणला असून, रात्री उशिरा त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या तरुणाचा गॅस गळती होऊन गुदमरून मृत्यू झाल्याचे समजते. रत्नागिरी एमआयडीसीतील एका कंपनीचा एक प्लँट ओडिशाला काही वर्षांपूर्वी शिफ्ट झाला होता. रत्नागिरीत प्लँटमध्ये काम करणारे अनेक कामगार ओडिशाला गेले होते. त्या प्लांटमध्ये मोठी दुर्घटना झाल्याची माहिती रत्नागिरीत धडकली. या माहितीनंतर कामगारांच्या कुटुंबांमध्ये घबराट निर्माण झाली होती. जो तो आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधत होता. अनेकांचे फोन बंद आल्याने त्यांची भीती अधिकच वाढली. नेमकं काय घडलंय, हे कोणालाच कळत नव्हते; मात्र काहीतरी दुर्घटना झालीय, याची माहिती कुटुंबीयांना मिळाली होती.
या दुर्घटनेबाबत ओडिशातील काही कामगारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्या कामगारांनी माहिती देण्यास नकार दिला. अखेरीस ज्या गावातील तरुणाचा मृत्यू झालाय, त्या गावात ओडिशामधून फोन आला आणि सारा प्रकार पुढे आला. ओडिशाला शिफ्ट झालेल्या त्या प्लांटमध्ये गॅस वाहून नेणाऱ्या पाइपलाइनचा व्हॉल्व्ह अचानक फुटला आणि त्यात गुदमरून त्या तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, मोठा भाऊ असे कुटुंब आहे.