रत्नागिरी : रत्नागिरीत भरदिवसा झालेल्या अनंत भिसे खूनप्रकरणी
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रदीप भिसेविरुद्ध केलेले
अपील फेटाळले असून, त्याच्या निर्दोष ठरवलेल्या निकालावर शिक्कामोर्तब केले
आहे. प्रदीप भिसे यांच्यावतीने वकील राकेश भाटकर यांनी मुंबई
उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर काम पाहिले.
रत्नागिरीतील अनंत भिसे हे १५ डिसेंबर १९९९ रोजी दुपारी १२ वाजण्याच्यादरम्यान त्यांच्या नातेवाईकांसहित राहत्या घरातील अंगणामध्ये
गप्पा मारत बसले हाेते. त्यावेळी प्रदीप भिसे यांनी त्यांच्यावर
वैयक्तिक वादातून चाकूने वार केले असल्याचा आरोप करण्यात आला होता. या खुनासाठी प्रदीप भिसे यांना जबाबदार धरून आरोपी करण्यात आले होते. नातेवाईकांनी अनंत भिसे यांना जखमी अवस्थेत रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. रुग्णालयातच त्यांचा मृत्यूपूर्व जबाब तेथेच नोंदवण्यात आला होता.
त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
या
प्रकरणी प्रदीप भिसे यांच्यावर खटला चालविण्यात येत हाेता. सर्व साक्षीदार तपासल्यानंतर रत्नागिरीतील
जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रदीप भिसे यांना निर्दोष मुक्त केले होते. सरकार पक्षातर्फे २००२ मध्ये प्रदीप भिसेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली
आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबात असलेल्या तफावतीमुळे तसेच
पुराव्याअभावी प्रदीप भिसे यांच्याविरोधातील अपील मुंबई उच्च न्यायालयाच्या
खंडपीठाने फेटाळले. हे प्रकरण मुंबई उच्च
न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती भिस्त
यांच्या खंडपीठापुढे चालले.