लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेरोना रुग्णांची संख्या वाढत होती. एप्रिलपासून गेली दोन महिने राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. आता पुन्हा आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याला चिपळूण शहर काँग्रेसने विरोध दर्शविला होता आणि विरोध आहेच. प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे लॉकडाऊन फसला. आपले अपयश झाकण्यासाठी प्रशासनाने अचानक कडक लॉकडाऊन करून व्यापारी आणि नागरिकांना वेठीस धरल्याचा आरोप शहराध्यक्ष लियाकत शाह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. किरकोळ व्यापारी मेटाकुटीस आलेत. भाडे, वीजबिल, कामगार पगार, बँकेचे हफ्ते, घरखर्च अशी अनेक संकटे समोर आहेत. यातून मार्ग निघाला नाही तर त्यांच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. गेले दोन महिने लाॅकडाऊन करून प्रशासनाने काय साध्य केले, याची माहिती जनतेला माहिती मिळावी, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे़ ० आजही रुग्णांची संख्या जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला होती, तेवढीच आहे. दररोज ३०० ते ४०० रुग्ण आजही सापडत आहेत. चुकीच्या पद्धतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली असून त्याला प्रशासन जबाबदार आहे, असे त्यांनी म्हटले आहे़ कोणतेही नियोजन नाही, उपाययोजना नाहीत. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी एकतर्फी निर्णय घेऊन व्यापारी आणि सामान्य नागरिकांना वेठीस धरणे हे योग्य नाही, असे शाह यांनी म्हटले आहे़