राजापूर : राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली. गुरुवार असल्याने अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली. गंगेच्या मागील गमनानंतर सुमारे १६० दिवसांनी ती अवतरली असून यापुर्वी दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईच्या आगमन व गमन या कालखंडाला छेद गेल्याचे अधोरेखीत ठरले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्व कुंडे तुडुंब पाण्याने भरली आहेत.
मागील वेळी ७ जुलै २०१८ ला गंगेचे आगमन झाले होते व १५ नोहेंबर २०१८ला ती अंतर्धान पावली होती. जवळपास शंभराहुन अधिक दिवस तिचे वास्तव होते. यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा त्यानंतर काही काळ वास्तव्याला असायची व नंतर ती अंतर्धान पावत असे. मात्र गेल्या काही वर्षात गंगेच्या आगमन व गमन या कालखंडाला बदल झाला असल्याचे पहावयास मिळाले. या कालावधीत तिच्या वास्तव्याचा कालावधी वाढला होता. शिवाय तिचे सलग आगमन झाल्याचेही पहावयास मिळाले होते.
गतवेळी १५ नोहेंबरला गंगा अंतर्धान पावल्यानंतर सुमारे १६० दिवसानंतर ती गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान पुन्हा अवतीर्ण झाली. गंगेच्या पुजेसाठी दररोज जाणारे राहुल काळे हे पुजारी गुरुवारी तेथे गेले असता गंगा आल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यानंतर काळे यांनी गंगापुत्रांसहित इतरत्र याची माहिती दिली. गंगा आल्याचे वृत्त पसरताच अनेकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली. त्यावेळी मुख्य असलेल्या काशिकुंडासहित अन्य कुंडे तुडुंब पाण्याने भरली होती तर काशिकुंडाच्याच बाजूला असलेल्या गोमुखातुन पाणी वाहत होते. गंगेचे आगमन झाल्यानंतर भाविकांची गंगाक्षेत्रावर रिघ सुरु होती.