तब्बल ३० वर्षांनंतर निवधेतील ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:28 AM2021-04-26T04:28:04+5:302021-04-26T04:28:04+5:30
देवरुख / सचिन मोहिते : संगमेश्वर तालुक्यातील निवधे गावाला जोडणाऱ्या बावनदी साकवावरून धोकादायक परिस्थितीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची ...
देवरुख / सचिन मोहिते : संगमेश्वर तालुक्यातील निवधे गावाला जोडणाऱ्या बावनदी साकवावरून धोकादायक परिस्थितीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आजपर्यंत येथील अबालवृद्धांवर होती. हे विदारक चित्र प्रत्यक्ष पाहिल्यानंतर ही समस्याच कायमची दूर करण्याचा शब्द आमदार शेखर निकम यांनी तेथील ग्रामस्थांना निवडणुकीपूर्वी दिला होता. त्यांनी निवधे पुलाचा प्रश्नच मार्गी लावत या पुलाकरिता तब्बल ४ कोटी ३२ लाख रूपये मंजूर केले आहेत. या पुलामुळे सुमारे ३० वर्षे या लोखंडी साकवावरून करावा लागणारा जीवघेणा प्रवास थांबणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील निवधे गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी दुर्गम भागात वसलेले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे १८००च्या घरात आहे. या गावाला जोडणाऱ्या बावनदीवर लोखंडी साकव आहे. मात्र, याची अवस्था अतिशय धोकादायक झाली आहे. निवधे गावातून बामणोली, ओझरे, मारळ, मार्लेश्वर, आंगवली, देवरुख या ठिकाणी जाण्यासाठी रहदारी सुरू असते. गावातील लोक व मार्लेश्वरकरिता चालत येणारे भाविक या पुलाचा वापर करतात.
हा लोखंडी साकव जुना असून, तो अतिशय धोकादायक बनला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पूल व्हावा, अशी ग्रामस्थ अनेक वर्षे मागणी करत होते. पावसाळ्यात ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पावसाळ्यात बावनदीला मोठे पाणी आल्यानंतर पाणी या लोखंडी पुलाला लागत असते. बावनदीवरील लोखंडी साकवाचे काही भाग गंजल्याने सडले आहेत. त्यामुळे मोठ्या पुरात हा साकव वाहून जाण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत होती.
याठिकाणी पूल उभारावा, अशी अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी हाेती. मात्र, त्याकडे आजवर दुर्लक्षच करण्यात आले. मात्र, निवडणुकीपूर्वी मतदार संघात फिरताना ही समस्या आमदार शेखर निकम यांनी पाहिली. त्याचवेळी त्यांनी तेथील ग्रामस्थांना पुलाचा विषय मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे आमदार निकम यांनी सीआरआयएफमधून बामणोली ते निवधे पुलासाठी तब्बल ४ कोटी ३२ लाख रुपये एवढा निधी मंजूर केला आहे.