घरडा येथील ‘त्या’वेळच्या वायूगळतीनेही उडवली हाेती झाेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:29 AM2021-03-24T04:29:44+5:302021-03-24T04:29:44+5:30
आवाशी : खेड तालुक्यातील लाेटे - परशुराम येथील घरडा केमिकल्स लि. कंपनीत २० मार्च राेजी झालेल्या स्फाेटातून अजूनही अनेकजण ...
आवाशी : खेड तालुक्यातील लाेटे - परशुराम येथील घरडा केमिकल्स लि. कंपनीत २० मार्च राेजी झालेल्या स्फाेटातून अजूनही अनेकजण सावरलेले नाहीत. या स्फाेटानंतर हादरलेल्या परिसरातील ग्रामस्थांना घरडा केमिकल्स कंपनीत २००२ साली झालेल्या वायूगळतीची आठवण हाेत आहे. त्यावेळी झालेल्या वायूगळतीने पंचक्राेशीची झाेप उडविली हाेती. तर आता स्फाेटामुळे परिसर हादरून गेला आहे.
लाेटे येथील घरडा केमिकल्स लि. या कारखान्यात २० मार्च राेजी स्फाेट हाेऊन लागलेल्या आगीत चार जणांचा हाेरपळून मृत्यू झाला. तर एकजण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. ज्या ठिकाणी हा अपघात घडला ताे विभाग या कंपनीचा रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट विभाग म्हणून कार्यान्वित आहे. येथीलच प्लाॅट नं. ७ बी मध्ये २० राेजी सकाळी साडेआठच्या सुमारास रिॲक्टमध्ये स्फाेट हाेऊन आग लागली. यावेळी तिथे काम करणाऱ्यांपैकी तीन जणांचा हाेरपळून जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यतिरिक्त अजूनही एकजण नवी मुंबई येथील ऐराेली येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची प्रकृती जैसे थे आहे.
कंपनीत सन २००२ मध्ये वायूगळती हाेऊन आवाशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या ४५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली हाेती. तर अनेक विद्यार्थी गुदमरले हाेते. काहींना कराड येथील रुग्णालयापर्यंत हलविण्यात आले हाेते. त्यावेळीही कंपनीने धाेक्याचा इशारा म्हणून सायरन वाजविला नव्हता. २० मार्च राेजी झालेल्या स्फाेटा दरम्यानही कंपनीने सायरन वाजवून धाेक्याची सूचना दिली नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. मात्र, याचवेळी कंपनीच्या युनिट हेडना सायरनबाबत विचारणा केली असता त्यांनी हाेकारार्थी उत्तर दिले हाेते. धाेक्याच्या वेळी सायरन न वाजविण्यामागील नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार सायरन वाजला तर ग्रामस्थांनी सांगितले सायरन वाजलाच नाही. यातील नेमका खरेपणा समाेर येणे गरजेचे आहे. कंपनीत हाेणाऱ्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी करण्यात येत आहे.