गणेशाेत्सव काळात ग्राम कृती दलावर सारा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:38 AM2021-09-07T04:38:42+5:302021-09-07T04:38:42+5:30
अडरे : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन सुरू झाले आहे. मात्र, कोरोनाकाळ आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता प्रशासनाने पूर्ण दक्षता ...
अडरे : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन सुरू झाले आहे. मात्र, कोरोनाकाळ आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता प्रशासनाने पूर्ण दक्षता घेत तयारी केली आहे. त्यासाठी प्रत्येक तपासणी नाका, एस. टी. बसस्थानक, रेल्वे स्थानक याठिकाणी आरोग्य व प्रशासकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच स्थानिक पातळीवर ग्राम कृती दल कार्यरत करण्यात आले असून, त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
यावर्षी निर्बंधांत काही प्रमाणात अधिक शिथिलता असल्याने चाकरमान्यांची संख्या वाढणार आहे. गणेशाेत्सवाआधी सुमारे चार ते पाच दिवस चाकरमान्यांचे आगमन सुरू होते. त्यानुसार शनिवारपासून कोकणात चाकरमान्यांचे आगमन सुरू झाले आहे. त्यासाठी प्रशासनही पूर्णतः सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत.
काेकणात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची तपासणी नाक्यावर माहिती घेतली जाणार आहे. त्यामध्ये नाव, मोबाईल नंबर, गावातील नातेवाईकांचे मोबाईल नंबर, संबंधित ग्रामपंचायत, त्याचबरोबर लसीकरण, कोरोना चाचणी अहवाल ही सर्व माहिती येथे घेतली जाणार आहे. ही माहिती त्याचदिवशी जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठवली जाणार असून, तेथून थेट तालुकास्तरावर आरोग्य विभाग तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली जाणार आहे. तेथून पुढे स्थानिक पातळीवर ग्राम कृती दलाकडे ही माहिती दिली जाणार आहे. गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्याला ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे असल्यास तातडीने तपासणी करून कोरोना चाचणी करणे आवश्यक असल्यास विलगीकरण व कोरोनाबाधित असल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क ही सर्व जबाबदारी ग्राम कृती दलाकडे राहणार आहे. तसेच गावात येणाऱ्या चाकरमान्यांची नोंददेखील ग्राम कृती दलाकडे राहणार आहे.
तपासणी नाका तसेच एस. टी. बसस्थानक व रेल्वे स्थानक येथे आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून, प्राथमिक चाचणी व आवश्यक वाटल्यास अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्हा प्रशासन ते थेट स्थानिक ग्रामस्थ अशी साखळी निर्माण करून चाकरमानी, प्रवाशांची काळजी घेतानाच गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा व कोरोनाला रोखण्यात यश मिळावे, या दृष्टिकोनातून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
------------------------
चार ठिकाणी तपासणी नाके
कोकणात प्रवेश करण्यासाठी कशेडी, कुंभार्ली, मुर्शी आणि खारेपाटण अशी चार प्रवेशद्वार आहेत. या चारही ठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून येथे पेंडॉल उभारण्यात आले आहेत. येथे आरोग्य, महसूल, आणि पोलीस असे पथक तैनात करण्यात आले आहे.