मी कोणतीही चूक केलेली नाही. मी दोषी नाही, त्यामुळे निश्चिंत आहे. प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याची हिंमत परमेश्वराने दिलेली आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक केले तरी चालेल मी घाबरत नाही, अशी स्पष्ट भूमिका राजापूरचे आमदार तथा ठाकरे सेनेचे उपनेते राजन साळवी यांनी मांडली.
राजन साळवींनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंध विभागाची मला नोटीस आली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभाग रत्नागिरी ऑफिसची नोटीस आहे. तसेच चौकशीचा मोर्चा मोठे भाऊ दीपक साळवी यांच्याकडे वळवला आहे. दीपक साळवी यांना चौकशीसाठी घेऊन या अशी नोटीस आली आहे. चौकशीसाठी आम्ही हजर राहणार आहोत, असं राजन साळवींनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंध विभाग सर्व कुटुंबाला वेठीस धरत आहेत, असा आरोपही राजन साळवी यांनी केला आहे.
माझ्या चौकशी दरम्यान ७० लोकांना नोटीस निघाल्या होत्या. माझ्या कुटुंबातल्या सर्वांनी सर्व माहिती एसीबी कार्यालयाकडे केव्हाच दिली आहे. कुटुंबाला त्रास देणे हा त्यांचा अजेंडा दिसतो आहे. सर्व टॅक्स भरले आहेत, माझ्यावर अजूनही कर्जाचा डोंगर आहे. माझे कुटुंब माझ्या पाठीमागे ठामपणे उभे आहे. न्यायव्यवस्थेवरील विश्वास मला न्याय नक्की देईल, असं राजन साळवी म्हणाले. तसेच त्रास द्यायचा, भीती दाखवायची हे कशासाठी सर्व केलं जात आहे?, असा सवालही राजन साळवी यांनी उपस्थित केला.