खेडमधील त्या तीनही मुली चीनमध्येच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:12 PM2020-02-06T13:12:22+5:302020-02-06T13:13:37+5:30
चीनमध्ये नांतोंग विद्यापीठात वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या खेड तालुक्यातील तीन विद्यार्थिनी सुरक्षित असून, त्यांना चीनच्या स्थानिक प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला असल्याची माहिती सादिया बशीर मुजावर या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी लोकमतला दिली.
खेड : चीनमध्ये नांतोंग विद्यापीठात वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या खेड तालुक्यातील तीन विद्यार्थिनी सुरक्षित असून, त्यांना चीनच्या स्थानिक प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला असल्याची माहिती सादिया बशीर मुजावर या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी लोकमतला दिली. शिक्षणात खंड पडू नये, यासाठी या तीनही विद्यार्थिनी चीनमध्येच राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.
खेड शहरातील सादिया बशीर मुजावर हिच्यासह शिर्शी येथील सुमेना मुनीर हमदुले व झोया महवाश हमदुले या विद्यार्थिनी चीनमधील नांतोंग प्रातांत वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थिनींपैकी सादियाशी तिचे वडील बशीर मुजावर यांनी ३ फेब्रुवारी रोजी रात्री दूरध्वनीवर संपर्क करून संवाद साधला.
सध्या या तीन मुलींच्या सुटीचा कालावधी आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत सुटी आहे. चीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कुणालाही घराबाहेर जाण्याची परवानगी दिलेली नाही. या तीनजणी त्यामुळे घरातच आहेत. अर्थात तेथे त्या पूर्ण सुरक्षित असल्याची माहिती बशीर मुजावर यांनी दिली. स्थानिक प्रशासन त्यांची पूर्ण काळजी घेत आहे.
या विद्यार्थिनींना मायदेशात जायचे असेल तर स्वत:च्या जबाबदारीवर व स्वखर्चाने परतावे लागेल, अशी सूचना करून चीनमधील स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, नांतोंग विद्यापीठ परिसरात कोणताही धोका नसल्याचा निर्वाळाही विद्यापीठ प्रशासनाने दिला. त्यामुळे सद्यस्थितीत शिक्षण अपूर्ण सोडून या विद्यार्थिनी परत येणार नसल्याची माहिती बशीर मुजावर यांनी दिली. आपण त्यांच्या नियमित संपर्कात असून, त्यांनी आपण सुरक्षित असल्याचे सांगितले आहे, असेही ते म्हणाले.
योग्य व्यवस्था
सादिया आणि तिच्या मैत्रिणी शाकाहारी आहेत. त्याची नोंद घेऊन त्यांना योग्य तो आहार दिला जात आहे. त्यांना कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी स्थानिक प्रशासनासह विद्यापीठाकडूनही लक्ष दिले जात आहे.