रत्नागिरी : पहिल्या टप्प्यातील शेवटचा आंबा विक्रीसाठी मुंबई, अहमदाबाद, सुरत मार्केटमध्ये पाठविण्यात आला. त्यामुळे मुंबई येथील वाशी मार्केटमधील प्रमाण कमी झाले. आता दुसऱ्या टप्प्यातील आंबा दि. १० एप्रिलनंतर सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असला, तरी स्थानिकांना मात्र दर्शन दुर्लभ झाले आहे.
गेल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमधील आवक मंदावली आहे. कोकणातून १७ ते १८ हजार पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. याशिवाय अन्य राज्यातून १० ते १२ हजार क्रेट आंबा विक्रीसाठी येत आहे. वाशी मार्केटमध्ये दोन ते साडेचार हजार रुपये पेटीला दर मिळत आहे. अन्य राज्यातील आंबा क्रेटमधून येत असून, २० किलोचे क्रेट विक्रीसाठी पाठविले जात आहेत. १२० ते १६० रुपये किलो दराने आंबा विक्री सुरू आहे.
या वर्षी पावसाळा लांबल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये आलेल्या मोहोराचे शेतकऱ्यांनी रक्षण केल्याने त्याचा आंबा बाजारात आला. मात्र, या वर्षी थंडी जानेवारीपासून सुरू झाली, शिवाय थंडीचे प्रमाण कमी असल्याने फारसा मोहोर झाला नाही. त्यामुळे एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. त्यातच अवकाळी पाऊस, उच्चतम तापमानाचा फटका आंबा पिकाला बसला आहे.
अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे आंब्याचे नुकसान झाले. गारपिटीच्या माऱ्यामुळे आंब्यावर काळे डाग पडून आंबा खराब झाला, शिवाय गेल्या आठवड्यात तापमानातील उच्चांकामुळे आंबा भाजला. एकूणच निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ऋतुमानातील बदल व विविध संकटातून वाचलेला आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. कोकणातून आंबा सुरू झाला असतानाच, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथील आंबाही बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. कोकणातील आंबा कमी असल्याने, काही विक्रेते कोकणच्या हापूस नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करून फसवणूक करीत आहेत. कोकणातील हापूसच्या तुलनेत अन्य राज्यांतील आंब्याचे दर कमी असल्यामुळे कमीतकमी खरेदी करून कोकण हापूस सांगून विक्री करून नफा कमवित आहेत.
अन्य राज्यातील आंबा विक्रीला
कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथून हापूस, बदामी, लालबाग, तोतापुरी आंबा विक्रीसाठी येत आहे. दररोज दहा ते बारा हजार क्रेट वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असून, १२० ते १६० रुपये किलो दराने आंबा विक्री सुरू आहे.
युरोप, आखाती प्रदेशात निर्यात
वाशी मार्केट येथे विक्रीसाठी येणाऱ्या आंब्यापैकी ४० टक्के आंबा युरोप व आखाती प्रदेशात विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. हवाई वाहतुकीपेक्षा जलवाहतूक स्वस्त असल्याने जलवाहतुकीद्वारे आंबा निर्यात सुरू आहे.
स्थानिक मार्केटमध्ये उपलब्धता
पहिल्या टप्प्यातील मोहोराचा आंबा संपला असून, दि. १० एप्रिलनंतर दुसऱ्या टप्यातील आंबा सुरू होणार आहे. एकूणच आंबा उत्पादन कमी असल्याने बहुतांश आंबा स्थानिक ऐवजी मुंबई, सुरत, अहमदाबाद येथे पाठविण्यात आला. त्यामुळे स्थानिक मार्केटमध्ये आंब्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ५०० ते १,००० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. उन्हामुळे डाग पडलेला आंबा २०० ते २५० रुपये डझन रुपये दराने विकण्यात येत आहे.
....................
पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असल्याने, दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू होण्यास अद्याप आठवडाभराचा अवधी आहे. या वर्षी आंबा उत्पादन कमी असून, त्या तुलनेत शेतकऱ्यांना दर उपलब्ध होत नाहीत. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यत होणारा खर्च लक्षात घेता, दर स्थिर राहणे अपेक्षित आहे.
- प्रदीप सावंत, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघ, रत्नागिरी