खेड : आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नातून दापोली मतदारसंघातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी एक रुग्णवाहिका मंजूर झाली आहे. यामध्ये दापोलीमधील २, मंडणगड व खेडमधील प्रत्येकी एक अशा एकूण ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.
कोविड-१९ चा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्याचे नियोजन करण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील खेड, दापोली व मंडणगड तालुक्यांमधील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील विविध समस्या जाणून घेतल्या हाेत्या. त्या समस्या निवारणासाठी तत्काळ शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमधील विविध समस्यांची माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली. या समस्यांमध्ये रुग्णवाहिकेची मुख्य समस्या दिसून आली आहे. खेड तालुक्यातील आंबवली, दापोली तालुक्यातील फणसू व केळशी तसेच मंडणगड तालुक्यातील देव्हारे या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका मंजूर झाली आहे. या रुग्णवाहिका येत्या १० ते १५ दिवसांत जनतेच्या सेवेसाठी रुजू होतील.
मतदारसंघातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री अनिल परब यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.