रत्नागिरी : गाडीवर चायनीजचे सर्व सामान लावून काहीतरी काम असल्याचे कारण सांगून घरी गेलेल्या तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री घडली. अनिकेत चंद्रकांत चाफेकर (२१) असे त्या तरूणाचे नाव असून, ही घटना शहरातील थिबापॅलेस नजिकच्या साईश्वरी अपार्टमेंटमध्ये घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.अनिकेत चंद्रकांत चाफेकर हा तरुण आपल्या आईसह राहत होता. मूळचे खंडाळा येथील असलेले कुटुंबीय व्यवसायासाठी रत्नागिरीत आले होते. शहरातील मारुती मंदिर येथील खाऊगल्लीत चायनीजची गाडी चालवून दोघे आपले जीवन जगत होते. सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे अनिकेत आपल्या आईसोबत खाऊगल्ली येथे गेला होता. गाडीवर साहित्य लावून झाल्यानंतर काहीतरी काम आहे, असे सांगून तो घरी आला.व्यवसायासाठी बाहेर पडून गेल्यानंतर तो पुन्हा घरी येत नसे. मात्र, सोमवारी तो घरी परत आल्याने शेजारच्या महिला त्याला पाहण्यासाठी गेल्या. त्यांना दरवाजा बंद असल्याचे लक्षात आले. अनिकेतने आतून प्रतिसाद न दिल्याने त्यांनी त्याच्या आईला माहिती दिली.
आई घरी आल्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी अनिकेतने बेडरूममधील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनिकेत नेमका कोणाच्या संपर्कात होता. त्याने शेवटचा संपर्क कोणाशी साधला होता. त्यातून त्याचे आत्महत्येचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.