चिपळुणातील सेवाभावी ब्राह्मण पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 11:28 AM2019-12-03T11:28:13+5:302019-12-03T11:29:42+5:30
चिपळूण येथील सेवाभावी ब्राह्मण सहकारी पतसंस्थेत ११ कोटी ७२ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापक राजेंद्र उर्फ राजू वसंत लोवलेकर याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली. लोवलेकर हा मुख्य आरोपी असून, तो वर्षभर फरार होता.
चिपळूण : येथील सेवाभावी ब्राह्मण सहकारी पतसंस्थेत ११ कोटी ७२ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापक राजेंद्र उर्फ राजू वसंत लोवलेकर याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली. लोवलेकर हा मुख्य आरोपी असून, तो वर्षभर फरार होता.
सेवाभावी ब्राह्मण सहकारी पतसंस्थेत हा सुरुवातीपासूनच व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. तीन वर्षांपूर्वी पतसंस्थेत ११ कोटी ७२ लाख रुपयांचा अपहार झाल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पतसंस्थेच्या मुख्य व्यवस्थापक राजेंद्र लोवलेकर (रा.परिजात सोसायटी, मार्कंडी चिपळूण) याच्यावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू होती.
लोवलेकर याच्या वास्तव्याची काहीही माहिती समजून येत नव्हती. त्यामुळे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक विशेष पथक तयार करून पुणे व मुंबई येथे शोध त्याचा घेतला. या पथकाने लोवलेकर याला कौशल्यपूर्ण शोध घेऊन ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला सोमवारी येथील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान लोवलेकर याला न्यायालयात हजर केल्याची माहिती गुंतवणुकदारांना मिळताच अनेकांनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली होती.
पोलिसांच्या या पथकात पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलीस हवालदार संदीप कोळंबेकर, शांताराम झोरे, पोलीस नाईक विजय आंबेकर, दत्ता कांबळे यांनी चोख कामगिरी बजावली.
लोवलेकर याचे आश्रमात वास्तव?
गेली वर्षभर फरार असलेला लोवलेकर हा एका आश्रमात वास्तव्य करीत होता. त्याच आश्रमातील दिंडीत तो पोलिसांच्या हाती लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याविषयी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला असता याबाबत सद्यस्थितीत विस्तृत माहिती देता येणार नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.