रत्नागिरी जिल्ह्यात श्रावणात आषाढधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 03:15 PM2019-08-03T15:15:00+5:302019-08-03T15:15:51+5:30
श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याऐवजी आषाढासारखाच पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्याला चांगलाच दणका दिला असून, सर्वाधिक पाऊस उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पडला आहे. या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरील वाहतूक आज सकाळी पुन्हा बंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी : श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याऐवजी आषाढासारखाच पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्याला चांगलाच दणका दिला असून, सर्वाधिक पाऊस उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पडला आहे. या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरील वाहतूक आज सकाळी पुन्हा बंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारपासून पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात आषाढासारखे आगमन केले आहे. त्यामुळे रात्री राजापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. मध्यरात्रीनंतर पावसाचा वेग काहीसा कमी असल्याने पुराचे पाणी ओसरले. सकाळपासून पुन्हा पावसाने प्रमाण वाढले.
मुसळधार पावसामुळे रात्री साडेअकरा वाजता जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. मात्र सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर पुन्हा पाण्याची पातळी वाढल्यामुळे साडेदहा वाजता ही वाहतूक बंद करण्यात आली. जगबुडी तसेच नारिंगी नदीचे पाणी वाढल्यामुळे खेड-दापोली रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे काही वेळासाठी हा मार्गही बंद करण्यात आला होता. संगमेवर तालुक्यातील गोळवली-करजुवे या अंतर्गत रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झाली आहे. दरड हटवण्याचे काम सुरू आहे.
कशेडी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावरील वाहतूक विन्हेरे, मंडणगड मार्गे वळवण्यात आली आहे.