खेड : तालुक्यातील चोरवणे जखमीचीवाडी या कित्येक वर्षे रखडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामासाठी २६ जानेवारी रोजी संतोष अनंत मेस्त्री आणि ग्रामस्थ यांनी आमरण उपोषणाचा इशारा देताच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याबाबत लेखी पत्र देऊन उपोषण स्थगित केले होते.
या रस्त्याचे काम २०१९-२० या आर्थिक वर्षात मंजूर झाले होते. मात्र, प्रत्यक्षात या रस्त्याचे काम यावर्षी मार्च महिन्यात सुरू करण्यात आले आहे. चोरवणे जखमीचीवाडी रस्त्याचे सुरू करण्यात आलेले डांबरीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे, असे चोरवणे जखमीचेवाडीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तशी तक्रार चिपळूण बांधकाम विभागाचे कदम यांना अनेकदा दिली. मात्र ग्रामस्थांच्या या तक्रारीकडे बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. सद्यस्थितीत निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे कामाची पाहणी करावी, अशी मागणी वसंत मोरे, सुनील मेस्त्री व संतोष मेस्त्री आदी ग्रामस्थांनी केली आहे.
बांधकाम खात्यातील संबंधित अधिकारी चोरवणे जखमीचीवाडीमध्ये हजर न झाल्यास १ मे राेजी पुन्हा उपोषणाला बसू, असा इशारा बांधकाम विभागाला ग्रामस्थांनी दिला आहे.
......................................
khed-photo251
खेड तालुक्यातील चोरवणे जखमीचीवाडी ते गारवणे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे.