चिपळूण : सुमारे आठ कोटी रुपये खर्चातून सुरू असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट रत्नागिरी येथील पॉलिटेक्नीकमार्फत सुरू झाले आहे. दरम्यान, नाट्यगृहातील रंगमंचाला काशिनाथ घाणेकर यांचे नाव देण्यात आले आहे.साधारण १५ वर्षे नाट्यगृह बंद होते. इतक्या वर्षात एकही नाटक अथवा अन्य कार्यक्रम या नाट्यगृहात झालेला नाही. त्यामुळे या नाट्यगृहाविषयी चिपळूणवासियांना तितकीच प्रतीक्षा लागून राहिली आहे. आता अंतिम टप्प्यात असलेल्या या नाट्यगृहाचे उद्घाटन याचवर्षी डिसेंबर अखेरपर्यंत करण्याची तयारी नगर परिषदेने सुरू केली आहे.
नाट्यगृहात सुमारे आठशे खुर्च्या असून, त्यापैकी पहिल्या दोन लाईनमधील खुर्च्यावगळता अन्य बैठक व्यवस्था पूर्ण झाली आहे. रंगमंचावर सरकता पडदा उभारण्यात आला आहे.पूर्वी लाकडी स्वरूपात असलेला रंगमंच पुन्हा त्याच धर्तीवर तयार करण्यात आला आहे. विद्युतीकरण व वातानुकूलन यंत्रणेचे कामही पूर्णत्त्वास गेले असल्याने आता केवळ अंतिम स्वरूपाचा हात त्या कामावर फिरवला जात आहे.
त्यानुसार संबंधित ठेकेदार कंपनी हे नाट्यगृह काही दिवसांतच नगर परिषदेच्या ताब्यात अत्याधुनिक सुविधांसह देणार आहे. त्यामुळे चिपळूणकरांना आता सुसज्ज नाट्यगृहात नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे.नाट्य संयोजकांच्या सोयीचे दरइंदिरा सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरण केलेल्या व वातानुकूलित नाट्यगृहाच्या भाडेदराविषयी आधीच गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. नाट्य संयोजकांना जास्तीचा भुर्दंड पडू नये यासाठी सुरूवातीलाच दक्षता घेण्यात आली आहे. वातानुकूलित नाट्यगृहासाठी १५ हजार रुपये, तर विनावातानुकूलित ६ हजार रुपये भाडे ठरविण्यात आले आहे. नाट्य संयोजकांच्या दृष्टीने हा दर योग्य असल्याचे मानले जात आहे. मात्र, यापेक्षा अधिक दर आकारल्यास ते न परवडणारे ठरेल, असे मत काही नाट्य संयोजकांनी व्यक्त केली आहे.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राविषयी सर्वांनाच उत्सुकता असून, या नाट्यगृहाचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. सोमवारी प्रत्यक्ष या कामाची पाहणी केली असून, स्वयंचलित सरकते पडदे आणि वातानुकलन यंत्रणेचे प्रात्यक्षिकही घेतले. त्यामुळे एक चांगली वास्तू चिपळूणवासियांच्या सेवेत रूजू होणार आहे.- सुरेखा खेराडे,नगराध्यक्ष