निवळी - जयगड रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:43+5:302021-07-20T04:21:43+5:30
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील निवळी ते जयगड रस्त्याची पूर्णतः दैना उडाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता अशी अवस्था ...
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील निवळी ते जयगड रस्त्याची पूर्णतः दैना उडाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे. या रस्त्यावरून नियमित ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या रस्त्याची येत्या ८ दिवसांत दुरुस्ती करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून खड्डे भरावे लागतील, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिला आहे.
गेले अनेक महिने या मुख्य रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवजड वाहतुकीमुळेच या रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती तत्काळ व्हावी, अशी वाहनचालकांसह ग्रामस्थांनी आग्रही मागणी केली आहे. या मुख्य रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते व ठेकेदार दुर्लक्ष का करत आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. निवळी ते जयगड या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ मोठी आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था भयावह झाली आहे. रस्त्यात पडलेल्या खड्डयांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे रात्रीच्यावेळी मोठा अपघात होऊ शकतो, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. संबंधित खात्याच्या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त हाेत आहे.
-----------------------------------------
रत्नागिरी तालुक्यातील निवळी ते जयगड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून चालणेही मुश्किल झाले आहे.