राजापूर : गत महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड आणि नुकसान झाले आहे. वादळानंतर झालेल्या नुकसानातून आपदग्रस्त सावरून नव्या जोमाने पावसाळ्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, वादळानंतर १५ दिवसांचा कालावधी उलटला तरी आपदग्रस्तांची झोळी शासकीय मदतीअभावी रितीच राहिली आहे.
तौक्ते वादळाचा तालुक्याला विशेषतः पश्चिम भागाला जोरदार तडाखा बसला. त्यामध्ये तालुक्याचे एक कोटी ४७ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. १५ दिवसांपूर्वी कोकणामध्ये ताैक्ते वादळ धडकले होते. या वादळाचा जोरदार तडाखा सागरी किनारपट्टीवरील गावांना बसला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसली तरी विजेच्या तारा तुटून, वीजखांब पडून अनेक दिवस अनेक गावांना काळोखामध्ये राहावे लागले होते. वादळामध्ये झालेल्या पडझडीची शासनाच्या प्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाहणी केली. आपदग्रस्तांशी संवाद साधून शासकीय मदत मिळवून देण्याबद्दल आश्वासितही केले. मात्र, १५ दिवसांनंतरही आपदग्रस्तांना शासकीय मदत मिळालेली नाही.