ही तर शिवसेनेच्या ऱ्हासाची सुरुवात : प्रमोद जठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:20 AM2021-07-05T04:20:22+5:302021-07-05T04:20:22+5:30
राजापूर : आपल्या भागातील भावी पिढीचा विकास व्हावा या ध्यासाने पछाडलेल्या आणि विकासाची कास धरलेल्या राजा काजवे, पंढरीनाथ आंबेरकर ...
राजापूर : आपल्या भागातील भावी पिढीचा विकास व्हावा या ध्यासाने पछाडलेल्या आणि विकासाची कास धरलेल्या राजा काजवे, पंढरीनाथ आंबेरकर यांसह या शेकडो शिवसैनिकांनी विकासाचा मारेकरी ठरलेल्या शिवसेनेचा त्याग करून भाजपमध्ये केलेला प्रवेश हा भविष्यातील शिवसेनेच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाची सुरुवात असल्याचा घणाघात भाजपाचे प्रदेश चिटणीस, रत्नागिरी जिल्हा प्रभारी व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे. यापुढे आता अनेकांचे असेच भाजपमध्ये पक्षप्रवेश होतील, असेही जठार यांनी सांगितले.
कोकणच्याच नव्हे तर देशाच्या विकासाला गती देणारा रिफायनरी प्रकल्प होणारच अशी गर्जना करतानाच भविष्यात ज्या साडेआठ हजार शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची संमती पत्रे दिलेली आहेत त्या शेतकऱ्यांची लॅन्ड पुलिंग कायद्यांतर्गत कंपनी प्रस्थापित करून पुणे येथील मायग्रा प्रकल्पाच्या धर्तीवर रिफायनरी प्रकल्पासाठी जागा देऊन इथल्या शेतकऱ्यांना समृध्द करण्याचा आमचा निर्धार असल्याची घोषणाही जठार यांनी यावेळी केली.
राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात जठार बोलत होते. प्रमाेद जठार पुढे म्हणाले की, ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, तळागाळात शिवसेना वाढविली त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आज शिवसेनेत किंमत नाही, कायमच भावनिक राजकारण करून शिवसेनेने निवडणुका जिंकल्या आहेत, पण आता कोकणातील जनता शहाणी झाली आहे. शिवसेनेच्या कोणत्याही आश्वासनाला आता ती बळी पडणार नाही, कारण तिनं आता आपला विकास आपणच करायचं ठरवलं, असे ते म्हणाले.
आपली नाही तर इतरांची चूल पेटली पाहिजे, भविष्यात माझ्या बेरोजागार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आणि माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे ही दृष्टी ठेवून काजवे, आंबेरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. निश्चितच त्यांच्या प्रयत्नांना फळ येणार नव्हे रिफायनरी राजापुरातच आणि तीही नाणार परिसरातच होणार, असेही जठार यांनी सांगितले. मायग्राच्या माध्यमातून जे पुण्यात होऊ शकते ते राजापुरातही होऊ शकते हे आम्ही दाखवून देऊ. रिफायनरी प्रकल्प राजापुरातून घालवायला आम्ही देणार नाही, असेही जठार यांनी सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, अनिकेत पटवर्धन, अनिलकुमार करंगुटकर, महादेव गोठणकर, यशवंत वाकडे, डॉ. अमोल तेली, प्रवेशकर्ते राजा काजवे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक विलास पेडणेकर, दीपक बेद्रे, सुहास मराठे, सुरज पेडणेकर, विजय कुबडे, अरविंद लांजेकर, आशिष मालवणकर, मोहन घुमे, शीतल पटेल, शिल्पा मराठे, पंकज गुरव, संदेश विचारे, रसिका कुशे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------------------
राजापुरातील पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रमोद जठार यांनी मनाेगत व्यक्त केले. यावेळी अनिल करंगुटकर, रवींद्र नागरेकर, अभिजित गुरव, डॉ. अमोल तेली, यशवंत वाकडे, अनिकेत पटवर्धन उपस्थित हाेते.