भयंकर... एकावर एक बेड रचून उभे राहिले डॉक्टर, पेशंट रात्रभर बाथरूमच्या वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:26 AM2021-07-25T04:26:09+5:302021-07-26T14:54:21+5:30
पुरामुळे चिपळूणचं प्रचंड मोठं नुकसान; रुग्णालयात डॉक्टरांनी अनुभवली भयंकर परिस्थिती
संदीप बांद्रे / चिपळूण : पुराचे पाणी हळूहळू चिपळूण शहरात भरू लागले आणि गुरुवारी पहाटे ४ वाजता इशाऱ्याचा भाेंगा वाजला. हळूहळू पाणी रुग्णालयाच्या पायरीपर्यंत आले. काही क्षणातच पाणी रुग्णालयात भरू लागताच मदतीसाठी संपर्क साधण्यात आला. मात्र, मदत न पाेहाेचल्याने डाॅक्टरांना बेडवर तर रुग्णांना बाथरूमवर राहण्याची वेळ आली. यावेळी वेळेत मदत न मिळाल्याने ८ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला तर शुक्रवारी पाणी ओसरल्यानंतर रुग्णालयाबाहेर आलेल्या कर्मचाऱ्यांना तब्बल ४८ तासांनी बिस्कीट आणि पाणी मिळाले, अशी परिस्थिती अपरांत रुग्णालयामधील डाॅक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर बेतली हाेती.
चिपळूण शहरात गुरूवारी पहाटे पुराचे पाणी शिरू लागले आणि एकच हाहाकार उडाला. काही क्षणात पुराच्या पाण्याने शहराला वेढा घालण्यास सुरूवात केली. पुराचे पाणी शहरात घुसू लागताच नगर परिषदेने गुरूवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमाराला इशाऱ्याचा भाेंगा वाजवला. हळूहळू हे पाणी काेविड रुग्णांसाठी सुरू केलेल्या अपरांत हाॅस्पिटलच्या परिसरात येऊ लागले. सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान पुराचे पाणी रुग्णालयाच्या पायरीपर्यंत आले आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी याचना केली. मुसळधार पावसामुळे विद्युत पुरवठाही खंडित झाला हाेता. त्यामुळे जनरेटरवर काम सुरू हाेते. तीन तासांनी जनरेटरही बंद पडला. त्यानंतर दाेन तासांनी इन्व्हर्टरही बंद झाला.
पुराचे पाणी वेगाने रुग्णालयात शिरत हाेते तर दुसरीकडे मदतीची प्रतीक्षा सुरू हाेती. मदतीअभावी साऱ्यांचाच जीव टांगणीला लागला हाेता. रात्री १० वाजता पाण्याची पातळी वाढल्यानंतर रुग्णालयातील रंगमंचावर एकावर एक बेड टाकून त्यावर डाॅक्टर उभे हाेते. तर साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना बाथरूमच्या वरील जागेत ठेवण्यात आले हाेते. मात्र, व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांना वाचविणे शक्य झाले नाही. पाण्याची पातळी डाॅक्टरांच्या गळ्यापर्यंत आल्यानंतरही मदतीचा हात त्यांच्यापर्यंत पाेहाेचला नाही.
शहरातील पुराचे पाणी शुक्रवारी सकाळी ओसरू लागल्यानंतर डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना दाेन परिचारिका वाहत जात असताना डाॅक्टरांनीच त्यांना वाचवले. पाण्यातून मार्ग काढत कसेबसे हे सारे बाहेर आले. शनिवारी ही सारी मंडळी पाेलीस स्थानकात दाखल झाली आणि त्यानंतर त्यांना खाण्यासाठी बिस्कीट आणि पाणी देण्यात आले. मात्र, ताेपर्यंत त्यांच्यापर्यंत ना मदत पाेहाेचली हाेती ना काेणतेही खाद्य.
---------------------
मदतीविना रात्र पाण्यातच
चिपळुणातील काेराेना रुग्णांसाठी जून महिन्यात क्रीडा संकुलात अपरांत काेविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी ५० बेडची व्यवस्था केलेली आहे. या रुग्णालयात एकूण २३ रुग्ण उपचार घेत हाेते. त्यामध्ये ८ रुग्ण व्हेंटिलेटरवर, ५ रुग्ण ऑक्सिजनवर तर अन्य रुग्णांचा समावेश हाेता. त्यांच्यासाठी सांगली, काेल्हापूर, इचलकरंजी येथील तीन डाॅक्टर, ४ परिचारिका आणि १७ कर्मचारी कार्यरत हाेते. पुराच्या पाण्यात अडकल्यानंतरही त्यांच्यापर्यंत मदतीचा हात पाेहाेचला नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागले.