"उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 11:52 AM2021-05-21T11:52:18+5:302021-05-21T12:57:54+5:30
माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला आहे.
रत्नागिरी/ मुंबई: तौक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. आज मुख्यमंत्री नुकसानीचा आढावा घेणार आहेत. रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. ही बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत. अशातच रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री केवळ चार तासांसाठी कोकणचा दौरा करत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाकडून केली जात आहे. त्यावर चार तासांसाठी आलो आहे. फोटोसेशन करायला आलो नाही. मला त्याची गरज वाटत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर आता भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला आहे.
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, माध्यमांना देखील खरं वाटत नाही की, उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर आले म्हणून मुख्यमंत्र्यांना देखील यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. फडणवीस साहेब कोकण दौऱ्यावर आले म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 21, 2021
तत्पूर्वी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील नुकसानीचा आढावा घेत आहेत. मात्र मुख्यमंत्री अवघ्या चार तासांचा दौरा करून मुंबईला परतणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या याच चार तासांच्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली होती. त्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, मी हेलिकॉप्टरमधून नव्हे जमिनीवरुन पाहणी करतोय, फोटोसेशन करायला आलेलो नाही, असा टोला लगावला.
'पॅकेज'वर माझा विश्वास नाही, पण मदतीशिवाय कुणी राहणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही #TauktaeCyclonehttps://t.co/e5DnA87Dih
— Lokmat (@MiLOKMAT) May 21, 2021
येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तसेच कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. मला कोणत्याही परिस्थितीचं राजकारण करायचं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.