रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ३ (ब)मधील पोटनिवडणूक येत्या ६ एप्रिल २०१८ रोजी होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. भाजपतर्फे वसंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे दाखल करण्यात आला. यावेळी भाजपतर्फे मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले.रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ३ (ब)मधील जागा तत्कालिन नगरसेवक राजेश सावंत यांनी सेनेचा राजीनामा दिल्याने रिक्त झाली होती. त्यामुळे या जागेसाठी येत्या ६ एप्रिलला निवडणूक होत असून, ७ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेले राजेश सावंत यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार वसंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी राजेश सावंत हे उपस्थित होते.राजेश सावंत यांनी सेनेतून भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपसाठीही ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, महेंद्र मयेकर, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, नाना शिंदे, दत्ता देसाई तसेच नगरसेवक उमेश कुळकर्णी, रोशन फाळके, विकास पाटील, माजी नगरसेवक विनय तथा भय्या मलुष्टे, माजी नगरसेविका राजश्री शिवलकर व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.पोटनिवडणूक तिरंगीप्रभाग ३ (ब)च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे माजी नगरसेवक, ज्येष्ठ नेते राजन शेट्ये यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज सेनेतर्फे लवकरच दाखल होणार आहे. या प्रभागातील जागा सेनेकडेच होती. त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी सेनेची जोरदार तयारी सुरू आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फेही उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. त्यासाठी सनीफ गवाणकर यांच्यासह अन्य काहींची नावे चर्चेत आहेत. तसे झाल्यास ही पोटनिवडणूक तिरंगी होईल. मात्र, शिवसेना व भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे.