महाविकास आघाडीचा निषेध करत भाजपचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 04:49 PM2020-02-25T16:49:15+5:302020-02-25T16:50:57+5:30
रत्नागिरी : उद्धवा अजब तुझे सरकार, स्थगितीसम्राट ठाकरे सरकारचा धिक्कार असो, नारीशक्तीच्या सन्मानासाठी भाजप मैदानात, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या शासनाचा ...
रत्नागिरी : उद्धवा अजब तुझे सरकार, स्थगितीसम्राट ठाकरे सरकारचा धिक्कार असो, नारीशक्तीच्या सन्मानासाठी भाजप मैदानात, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या शासनाचा धिक्कार, नवीन प्रकल्पांना विरोध करणाऱ्या सरकारचा निषेध अशा घोषणा देत भाजपने मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर भाजपतर्फे धरणे आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला.
महाआघाडी शासन येऊन तीन महिने होऊन गेले मात्र अद्यापही शासन सक्रीय आहे असे जाणवत नाही केवळ पूर्वीच्या लोकाभिमुख सरकारच्या कामांना स्थगिती देणे आणि दोन पक्षांना खोळंबत राहणे, एवढेच काम होताना दिसते. जलयुक्त शिवार ही शेतकऱ्यांना वरदान ठरलेली योजना केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रेय मिळते म्हणून बंद करण्यात येत आहे, हे दुदैर्वी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी अॅड. दिपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.
शेतकरी कर्जमुक्त नाही, कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. जनतेने केलेल्या अपेक्षा व आश्वासनांचा ताळमेळ बसला नाही. म्हणुन आज जिल्ह्यात सर्वत्र आंदोलन सुरू असल्याचे यावेळी अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
माजी खासदार नीलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली. ज्या रत्नागिरीने शिवसेनेला भरभरून दिले, त्या रत्नागिरीत येऊन मुख्यमंत्री ठाकरेंनी काहीही दिले नाही. कोकणी जनता धनुष्य-बाणावरच शिक्का मारणार हे त्यांनी गृहित धरले आहे. पण आता वातावरण पेटले आहे. त्यांचा ढोंगीपणा, दिखाऊपणा रत्नागिरीकर जनता किती दिवस सहन करणार? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. रत्नागिरी दौऱ्यात ठाकरेंनी नाणारबद्दल चकार शब्द काढला नसल्याचे त्यांनी सांगितले.