जयगड येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 02:38 PM2020-06-22T14:38:55+5:302020-06-22T14:39:51+5:30
मासे गरवण्यासाठी गेलेल्यांपैकी एकजण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला जयगड येथे घडली होती. या युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी तेथूनच १०० मीटरच्या परिसरात आढळून आला. वीरांची विलास खापले (१८, रा. पन्हळी, जयगड) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
रत्नागिरी : मासे गरवण्यासाठी गेलेल्यांपैकी एकजण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला जयगड येथे घडली होती. या युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी तेथूनच १०० मीटरच्या परिसरात आढळून आला. वीरांची विलास खापले (१८, रा. पन्हळी, जयगड) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
वीरांची हा रविवारी सकाळी आपल्या मित्रांसोबत मासे गरवण्यासाठी जयगड कासारी येथील बंधाऱ्यावर गेला होता. रविवारी समुद्राला अमावास्येची भरती होती. पाण्याचा जोर नेहमीपेक्षा अधिक होता तसेच पाण्याला करंटही होता. पाण्याची पातळीही नेहमीपेक्षा वाढली होती.
मासे गरवत असताना वीरांचीचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. पाण्याच्या प्रवाहासोबत वीरांची वाहत असल्याचे लक्षात येताच मित्रांनी आरडाओरड सुरू केली. तेथीलच जवळच्या गावातील ग्रामस्थ मदतीसाठी दाखल होईपर्यंत वीरांची पाण्यात बुडाला.
या घटनेची खबर स्थानिक पोलीस पाटील आणि प्रशासनाला देण्यात आली. रविवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. सोमवारी सकाळी पुन्हा त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. तो बुडालेल्या ठिकाणापासून १०० मीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.
भावाचे दोन वर्षापूर्वी निधन
वीरांची याच्या भावाचे दोन वर्षापूर्वीच निधन झाले आहे. आता वीरांची याच्या जाण्याने खापले कुटुंबियांचा आधारच गेला आहे. एकुलत्या एक वीरांचीच्या जाण्याने खापले कुटुंबियांवर दु:खाचा जणू डोंगरच कोसळला आहे.