संगमेश्वर तालुक्यातील निवळी येथील श्रीदेवी वाघजाई क्रीडा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेतील विजेत्या साेळजाई परशुरामवाडी संघाला चषक प्रदान करण्यात आला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील निवळी येथे श्रीदेवी वाघजाई क्रीडा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पंचक्रोशी तसेच निमंत्रित कबड्डी संघांच्या स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात संगमेश्वर तालुक्यातील सोळजाई परशुरामवाडी संघाने विजय संपादन करत वाघजाई क्रीडा मंडळ चषकाचा मानकरी ठरला आहे.
‘कबड्डी महासंग्राम २०२१’ या तिसऱ्या पर्वात १६ संघांनी सहभाग घेतला होता. संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील नामवंत खेळाडूंना प्रत्येक संघात खेळण्याची संधी देण्यात आली होती. रोशन शिंदे यांनी स्पर्धेचे समालोचन केले. या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुभाष बने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
द्वितीय क्रमांक बाजीश्वर अणदेरी कारभाटले संघ, तर तृतीय क्रमांक जुगाई कोसुंब संघाने पटकाविला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीदेवी वाघजाई क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, खेळाडू, निवळी येथील सर्व ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेतले. गुणलेखक म्हणून चेतन घडशी, तांत्रिक गुणलेखक म्हणून सेजल जाधव ,तर पंच म्हणून उमेश जाधव, उमेश बाईत, विश्वनाथ खाके यांनी काम पाहिले. राेशन शिंदे, मिलिंद शिंदे फणसवणे आणि संतोष कदम यांनी समालोचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भरत घडशी यांनी केले.