राष्ट्रसेवादल पूरग्रस्त सेवापथकाने पुस्तकांना दिले पुनरुज्जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:32 AM2021-07-28T04:32:49+5:302021-07-28T04:32:49+5:30
रत्नागिरी : महापुराने संपू्र्ण चिपळूण बाजारपेठच उद्ध्वस्त झाली आहे. पूरग्रस्त भागात मदतीचा ओघ सुरू आहे. अनेकांची अश्रू पुसण्यासाठी अनेक ...
रत्नागिरी : महापुराने संपू्र्ण चिपळूण बाजारपेठच उद्ध्वस्त झाली आहे. पूरग्रस्त भागात मदतीचा ओघ सुरू आहे. अनेकांची अश्रू पुसण्यासाठी अनेक जण मदतीचा हात देत आहेत. नागरिकांचे अश्रू पुसण्याचे काम करत असतानाच, राष्ट्रसेवादल सेवा पथकाने चिपळुणातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयातील पुस्तकांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम केले.
संगमश्वर तालुक्यातील मातृमंदिरच्या सहकार्याने पेठमाप येथील पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू किटचे वाटप केले.
गेल्या ४० वर्षांतील पूर पातळीच्या सीमा ओलांडत वासिष्ठीचा महाप्रलय चिपळूण आणि परिसर उद्ध्वस्त करून गेला. बाजारपेठ आणि खेर्डी, पेठमाप परिसरात १६-१७ फूट पाणी होते. या पूरग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी राष्ट्रसेवादलाचे सेवा पथक चिपळूण येथे दाखल झाले हाेते. २५ युवक-युवतींनी चिपळूण शहरातील अत्यंत पुरातन आणि अफाट ग्रंथसंग्रह असणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरनगर वाचनालयांतील पुराने साचलेला चिखल, माती दूर केली. त्यातील चांगली असणारी पुस्तके वेगळी काढली. या पुरात अत्यंत दुर्मीळ पुस्तके, संग्रह, काही दुर्मीळ ग्रंथ उर्दू पुस्तके उद्ध्वस्त झाल्याचे आढळले. त्यातील शिल्लक पुस्तकांचे जतन करतानाच, हे वाचनालय पूर्वीप्रमाणेच समृद्ध करण्यासाठी सेवादल प्रयत्न करेल, असे राष्ट्रसेवा दलाचे अभिजीत हेगशेट्ये यांनी सांगितले.
या श्रमदान सेवादल पथकात किरण राठोड, आचल शर्मा, बबलू शर्मा, अजय कळंबटे, संकेत काटकर, तन्मय राऊत, संग्राम जाधव, ईशा फाटक, रेखा रांबाडे, यश कांबळे, गणेश राऊत, अंकिता चौगुले, प्रथमेश घवाळी, तुषार मांडवकर, प्रा.सुशील घवाळी, प्रा.ताराचंद ढोबळे, प्रा.प्रकाश पालांडे, प्रा.सचिन टेकाळे, अमेय मुळे, कौशिक शेट्ये, मातृमंदिरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिर्के, सेवादल जिल्हाध्यक्ष रमाकांत सकपाळ, वाचनालय अध्यक्ष सुनील खेडेकर यांचा विशेष सहभाग होता. यावेळी पेठमाप येथील पूरग्रस्तांसाठी काही जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्यात आले.
-------------------------
राष्ट्रसेवा दलाचे संपर्क कार्यालय
चिपळुणात मदतीचे नियोजन शासन आणि प्रशासनाने नियंत्रित करणे गरजेचे आहे. राष्ट्रसेवादल माध्यमातून पुणे, मुंबई, सांगली, औरंगाबाद, रत्नागिरी येथून मदत येत आहे. त्याचे योग्य नियोजन व योग्य व्यक्तिपर्यंत ती पोहोचावी, यासाठी राष्ट्रसेवा दलाने चिपळूण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रांत कार्यालयाजवळ संपर्क कार्यालय सुरू केले आहे.
सध्या जीवनावश्यक वस्तू किट या सोबतच चादर, ब्लॅंकेट, सतरंजी, मेणबत्ती, सौरऊर्जा दिवे, फिनेल, कपडे, टाॅर्च असे गरजेचे आहे.
--------------------------
नागरिकांचे याेगदान हवे
नैसर्गिक आपत्तीत दुर्गम खेड्यातील आणि वस्तीतील उद्ध्वस्त कुटुंबांना सध्या परिस्थितीत किमान गरजा भागविण्यासाठी आधार राष्ट्रसेवा दलातर्फे देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी अनेकांना आर्थिक अथवा वस्तू रूपाने योगदान देण्याची इच्छा आहे. मातृमंदिर या सहयोगी संस्थेचे सहकार्य घेत आहोत. या कामी आपणही आपलं योगदान देऊ शकता, असे आवाहन मातृमंदिर आणि सेवादलाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अभिजीत हेगशेट्ये यांनी केले आहे.