असुर्डे : एका बाजूला तीव्र उष्म्यामुळे पाणीटंचाई होत चाललेली असताना चिपळूण तालुक्यातील कोकरे येथे खोदलेल्या बोअरवेलमधून पाणी थांबता थांबत नाही, असे अनोखे दृश्य पाहायला मिळत आहे. जमिनीतून पाण्याचा मोठा फवारा येत असल्याने तो पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करू लागले आहेत.
हिंदू धर्म शास्त्रानुसार जलाची पूजा केली जाते. लाखो रुपये खर्च करूनही ते मिळत नाही. सध्याच्या दिवसात तर चांगले चांगले स्रोत आटून जातात. परंतु कोकरे येथील संजय व मनोज पर्शराम दळवी यांच्या बादी येथील शेत जमिनीने मात्र कमालच केली आहे. तेथे खोदलेल्या बोअरवेलच्या पाण्याचा ओघ काही केल्या थांबत नाही. या शेतजमिनीत झाडांची लागवड केली आहे. ती अतितीव्र उष्णतेमुळे सुकून जात होती. यासाठी या भावांनी बोअरवेल पाडण्याचा निर्णय घेतला. अखेर मंगळवारी रात्री २० फुटापर्यंत बुरूम माती, तर १५० फुटापर्यंत कातळ लागला.
त्यानंतर १७० फुटापर्यंत बोअरवेलचे खोदकाम करून ७ इंच पाईप टाकण्यात आला. परंतु रात्री ११ वाजल्यापासून अद्याप ७ इंच पाईप सातत्याने ओसंडून वाहात आहे.
हे पाणी बाहेर जाऊ नये. म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु सर्व उपाय व्यर्थ ठरले आहेत. हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी अनेकजण येत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यात भूजल पातळी खाली जाते. परंतु इथे मात्र पाणी भरभरून वाहात आहे. जमिनीतील पाणी वर काढण्यासाठी लोकांना आटोकाट प्रयत्न करावे लागतात. परंतु इथे मात्र हा स्रोत आता थांबविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी भूगर्भतज्ज्ञांनाही बोलावले जाणार आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे हे पाणी गरम आहे. त्यामुळे हे गंधकाचे पाणी आहे, असा अनेक जण दावा करीत आहेत. काही जणांनी पाण्याची चव घेतली असता सर्वसाधारण पिण्याच्या पाण्याची चव आहे.
बोअरवेलच्या पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की, जवळच असलेल्या नदीत हा प्रवाह जात असल्यामुळे सुकलेल्या
नदीत पाणीच पाणी दिसत आहे.
यामुळे भूगर्भातील जलाशयाची पातळी, आजूबाजूच्या पाण्याचे स्रोत यांचा अभ्यास करण्याची गरज आहे.