भांबेड येथे पुलाचा पिलर कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:26 AM2017-12-25T00:26:00+5:302017-12-25T00:31:32+5:30

The bridge collapsed at Bhanbaad | भांबेड येथे पुलाचा पिलर कोसळला

भांबेड येथे पुलाचा पिलर कोसळला

Next


लांजा : तालुक्यातील भांबेड पवारवाडी येथील ब्रिटीशकालीन पुलाच्या एका खांबाचा काही भाग कोसळल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली असून, तालुक्यातील जुन्या व नादुरुस्त पुलांचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.
लांजा तालुक्यातील वाटूळ - दाभोळे राज्य महामार्गावरील भांबेड पवारवाडी येथील हा ब्रिटीशकालीन पुल हा रस्ता मुंबई-गोवा महामार्ग व रत्नागिरी कोल्हापूर-नागपूर महामार्गांना जोडणारा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची
वर्दळ असते. तसेच याच भागात अनेक
क्रशर असल्याने अवजड वाहतूकदेखील येथून मोठ्या प्रमाणावर होते.
हा पूल गेल्या पावसाळ्यापूर्वी जीर्ण होऊन वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. तरीही या मार्गावर वाहतूक चालू होती. या पुलाच्या डागडुजीची अनेकवेळा मागणी करूनही प्रशासनाने याकडे
दुर्लक्ष केले आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
प्रशासनाने नुकतीच या २८ किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाची निविदादेखील काढली आहे. मात्र अजूनही पुलाच्या कामाकडे डोळेझाक केली आहे. अत्यंत धोकादायक अवस्थेत असलेल्या या पुलाचा पिलर शनिवारी रात्रीच्या सुमारास कोसळल्याने हा पूल कधीही कोसळण्याची भीती असून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटला
१९७५-७६ साली या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली होती. मात्र ब्रिटीशकालीन खांब कायम ठेवण्यात आले होते. याच खांबांपैकी दोन नंबरच्या खांबाचा काही भाग कोसळला आहे. यामुळे या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे वाटूळ-भांबेड, विलवडे, व्हेळ, वाघणगाव या गावांचा भांबेडशी संपर्क तुटला आहे, तर देवरुख, साखरपा दाभोळे, शिपोशी व कोचरी या गावांचा वाटूळशी संपर्क तुटला आहे. लवकरच पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: The bridge collapsed at Bhanbaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.