अरुण आडिवरेकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : काेराेनाचा वाढता संसर्ग राेखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ माेहीम हाती घेण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना घरपाेच सेवा देण्याची सुविधा हाती घेतली आहे. जेणेकरून रस्त्यावर अनावश्यक हाेणारी गर्दी टाळता येऊ शकेल. नागरिकांना घरपाेच धान्य मिळेल; पण नागरिकांनी घरातच थांबावे, हा यामागचा उद्देश आहे.
जिल्ह्यात काेराेनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी आलेल्या अहवालानुसार तब्बल ५५५ नवे काेराेनाचे रुग्ण आढळले. आजवरच्या आकडेवारीतील हा उच्चांक आहे. त्याहीपेक्षा आता आढळणाऱ्या रुग्णांमध्ये ४५ वर्षांखालील तरुणांची संख्या अधिक आहे, तर सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात १० जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला. वाढती रुग्णसंख्या आणि वाढता मृतांचा आकडा ही चिंतेची बाब असून, काेराेना संसर्गाची ही साखळी ताेडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांची कडक अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येत आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना जरब बसावी यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी पाेलीस तैनात करण्यात आले आहेत. विनाकारण काेणी बाहेर फिरताना दिसल्यास त्यांची अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. त्याचा धसका अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने आता सर्वच दुकाने बंद ठेवून घरपाेच सेवा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी दुकाने बंद राहणार आहेत. दुकाने बंद राहिल्याने नागरिकांना आवश्यक असणारे सामान मिळणे कठीण हाेणार आहे. नागरिकांची हाेणारी ही गैरसाेय लक्षात घेऊन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नागरिकांना घरपाेच धान्य मिळण्यासाठी अत्यावश्यक सेवा पाेहाेचविण्यासाठी काही किराणा व्यापारी, स्वयंसेवक यांची यादी तयार केली आहे. ही यादी नगर परिषदनिहाय प्रत्येक तालुक्यात करण्यात आली आहे. त्याचे नियाेजन स्थानिक पातळीवर तहसीलदार व नगर परिषद प्रशासन यांच्याकडे देण्यात आले आहे. ही यादी तालुक्यातील सर्व घटकांपर्यंत पाेहाेचविण्याचे प्रयत्न प्रशासनाने केले आहेत. या यादीतील क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक वस्तूंची यादी दिल्यास त्या घरपाेच देण्यात येणार आहेत.
नागरिकांनी घराबाहेर न पडता जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
‘ब्रेक द चेन’मध्ये रत्नागिरीकरांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. असेच सहकार्य यापुढेही नागरिकांनी करावे. जेणेकरून काेराेनाची ही साखळी खंडित करता येईल. संचारबंदीच्या काळात नागरिकांची काेणतीही गैरसाेय हाेणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
- लक्ष्मीनारायण मिश्रा,
जिल्हाधिकारी रत्नागिरी.
यादी तयार
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घरपाेच सेवा देण्यासाठी किराणा व्यापारी व स्वयंसेवकांची यादी तयार केली आहे. घरपाेच सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील १४० व्यापाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
सारेच सज्ज
काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन, त्याचबराेबरच स्वयंसेवकही सज्ज झाले आहेत. नागरिकांनी घरात थांबून प्रशासनाला सहकार्य केल्यास ही साखळी ताेडण्यास मदत हाेणार आहे.